आर्थिक मंदीचे खापर ‘मारुती’वर!
By Admin | Updated: March 26, 2015 01:36 IST2015-03-26T01:36:11+5:302015-03-26T01:36:11+5:30
साईनगरीतील आर्थिक मंदीचे खापर दक्षिणमुखी मारुती मंदिरातील जुनी मूर्ती बदलून चार वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मूर्तीवर फोडले जात आहे.

आर्थिक मंदीचे खापर ‘मारुती’वर!
प्रमोद आहेर - शिर्डी (अहमदनगर)
साईनगरीतील आर्थिक मंदीचे खापर दक्षिणमुखी मारुती मंदिरातील जुनी मूर्ती बदलून चार वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काळ्या रंगाच्या मूर्तीवर फोडले जात आहे. त्यामुळे मारुतीरायाची शिर्डीतील मूर्तीच सध्या वादविवादाचा केंद्रबिंदू ठरली असल्याचे चित्र आहे.
साईबाबांच्या वास्तव्याची नोंद असलेल्या या मंदिरात पूर्वी शिर्डी व बिरेगाव या दोन गावांच्या दोन मूर्ती होत्या़ यातील एक मूर्ती हनुमानाची नसल्याचेही सांगितले जाते़ चार-पाच वर्षांपूर्वी संस्थानने मंदिराचा जीर्णोद्धार केला. तामिळनाडूतील महाबलीपुरम येथून आणलेली काळ्या पाषाणातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. मारुतीच्या मूर्तीला शेंदूरच पाहिजे, काळी मूर्ती बसवल्याने गावचे गावपण हरवले, संकटे येत आहेत. आर्थिक मंदी आली आहे, असा दावा करत संस्थान वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या जुन्या मूर्ती पुन्हा बसवाव्यात यासाठी माजी सरपंच रावसाहेब गोंदकर यांनी सध्या मोहीम उघडली आहे़ ही मूर्ती दक्षिणाभिमुखी असली तरी प्रत्यक्षात मूर्तीचा चेहरा आग्नेय दिशेला आहे. हातात द्रोणागिरी पर्वत उचललेल्या या मूर्तीचा आशीर्वाद देणारा हातही व्यस्त आहे, असे आक्षेपही घेतले जात आहेत़ हनुमान जयंतीपर्यंत त्यावर काहीतरी निर्णय अपेक्षित आहे़
काळ्या पाषाणातील मूर्तीत जास्त ऊर्जा असते़ मात्र तिचे पावित्र्य न राखल्यास त्रास होतो़ मूर्तीला शेंदूर लावल्यास ती सौम्य होईल़
- मोहनबुवा रामदासी, कार्यवाह, रामदास स्वामी संस्थान, सज्जनगड
शेंदूरविरहीत मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळीच आपण शंका उपस्थित केली होती़ जुन्या मूर्ती भंगलेल्या नव्हत्या, याचमुळे आपण त्या विसर्जित न करता वस्तुसंग्रहालयात ठेवण्याचा सल्ला दिला होता़ आता या मूर्तीला शेंदूर लावला तर ती सौम्य होईल़
- अनंतशास्त्री लावर, वेदाचार्य
मूर्तीची नजर आग्नेय दिशेकडे असल्याने ती दक्षिणमुखी नाही़ शास्त्रापेक्षाही परंपरेला महत्त्व असते, त्यामुळे पूर्वीप्रमाणे दोन मूर्ती आवश्यक आहेत़
- वैभव रत्नपारखी, ग्रामाचार्य