नाट्यसंमेलनाला आर्थिक चणचण
By Admin | Updated: February 7, 2015 02:58 IST2015-02-07T02:58:48+5:302015-02-07T02:58:48+5:30
संमेलन सुरळीत होईल, असे आयोजकांकडून छातीठोकपणे सांगितले जात असले तरी आयोजक संस्थेला अजूनही निधीची चणचण भासत आहे.

नाट्यसंमेलनाला आर्थिक चणचण
बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरी (बेळगाव) : ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे शनिवारी उद्घाटन होणार आहे. हे संमेलन सुरळीत होईल, असे आयोजकांकडून छातीठोकपणे सांगितले जात असले तरी आयोजक संस्थेला अजूनही निधीची चणचण भासत आहे. महाराष्ट्रातीलच नव्हेतर, परदेशातील मराठी लोकांनी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी आमच्या झोळीत दान टाकावे अशी याचना संयोजकांनी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून मिळणारा ५० लाखांचा निधीही अद्याप नाट्य परिषदेकडे मिळालेला नाही.
मराठी-कन्नड वादामुळे नाट्य परिषदेच्या बेळगाव शाखेने स्थानिक राजकारणी व्यक्तींना संमेलनाच्या आयोजनापासून दूर ठेवले. परिणामी संमेलनाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न सुरुवातीपासूनच उभा आहे. या संमेलनासाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च होईल, असे सुरुवातीला परिषदेकडून सांगण्यात येत होते. पण निधी उभा राहात नाही, हे पाहून खर्चावर नियंत्रण आणत सव्वा ते दीड कोटी रुपयांत संमेलन उरकायचे, असा निर्णय परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.
संमेलनासाठी निधी मिळावा म्हणून बेळगाव नाट्य परिषद शाखेच्या अध्यक्षा वीणा लोकूर यांनी पुण्यातील काही उद्योजकांशी याविषयी चर्चा केली. पण यात त्यांना कितपत यश आले हे समजलेले नाही. निधी संकलनाविषयी लोकूर म्हणाल्या, निधीचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला नाही. बेळगावातील मराठी लोकांनी संमेलनासाठी आर्थिक मदत केलेली आहे. ती पुरेशी नाही. त्यामुळे परदेशात जे अनिवासी मराठी लोक आहेत, त्यांच्याशी संपर्क साधून निधीसाठी आवाहन केलेले आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळालेला नाही. कर्नाटक सरकारकडून या संमेलनासाठी काहीही निधी मिळालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कुठल्याही वादाला तोंड न फुटू देता संमेलन यशस्वी करण्याचा प्रयत्न आहे. सीमावादाचा मुद्दा या संमेलनात नाही. या प्रश्नावरून काही वादळ उठू नये म्हणून नाट्यसंमेलनात कुठलेही परिसंवाद घेतले नाहीत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.