पर्यावरणस्नेही तांदळाची गणेशमूर्ती

By Admin | Updated: September 8, 2016 03:00 IST2016-09-08T03:00:52+5:302016-09-08T03:00:52+5:30

कुंकवाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्वरा, त्यांचा स्वीकार कर, अशी प्रार्थना करून देवपूजेला प्रारंभ करणाऱ्या हिंदू धर्मशास्त्रात

Eco-friendly Ganesh idol of rice | पर्यावरणस्नेही तांदळाची गणेशमूर्ती

पर्यावरणस्नेही तांदळाची गणेशमूर्ती

जयंत धुळप, अलिबाग
‘अक्षतास्तंडुला: शुभ्रा: कुंकुमेन विराजिता:।
मयानिवेदिता भक्त्या गृहाण
परमेश्वर ।।’
अर्थात, कुंकवाने रंगविलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुला भक्तीने समर्पण करतो. हे परमेश्वरा, त्यांचा स्वीकार कर, अशी प्रार्थना करून देवपूजेला प्रारंभ करणाऱ्या हिंदू धर्मशास्त्रात या तांदळाच्या अक्षतांना अनन्य साधारण महत्त्व आहे. त्याच अनन्यसाधारण महत्त्वातून धर्मशास्त्रानुसार श्रद्धा अबाधित राखत असतानाच, त्याच अक्षतांचा म्हणजेच तांदळाचा पर्यावरणस्नेही गणपती करून पर्यावरण संवर्धनाच्या आधुनिक विचाराची भक्ती करणारे खोपोलीमधील चौधरी कुटुंबीय म्हणजे गणेशोत्सवातून पर्यावरणाचा संदेश देणारे पर्यावरणदूतच ठरले आहेत.
मूळ खालापूर येथील संतोष चौधरी कुटुंबीयांच्या घरी गेल्या चार पिढ्यांपासून तांदळाचा रांगोळीद्वारे पाटावर गणपती साकारुन त्याची प्राणप्रतिष्ठापना करुन गणेशपूजा केली जात असे. गेल्या पाच वर्षांपूर्वी संतोष चौधरी व त्यांचे कुटुंबीय व्यवसाय व शिक्षणाकरिता जवळच्याच खोपोलीमध्ये राहावयास आले. चार पिढ्यांच्या परंपरेनुसार चौधरी यांच्या घरी पाटावर तांदळाच्या रांगोळीतून साकारलेला गणपती असे. आमच्याघरी माती वा तत्सम कोणत्याही प्रकारे देवाची मूर्ती करायची नाही असा प्रघात असल्याने मातीची मूर्ती कधीही पूजली जात नसल्याचे संतोष चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
चौधरी त्यांच्या आकांक्षा व पार्थ या मुलांच्या शाळेतील मित्रमैत्रिणी जेव्हा गणेशोत्सवात त्यांच्या घरी येत असत तेव्हा गणपतीच्या मूर्तीऐवजी तांदळाच्या रांगोळीपासून बनविलेला गणपती पहावयास मिळत होता. त्यावेळी तुम्ही गणपती बसवू शकत नाही का? असा प्रश्न ते विचारत. त्यामुळे चौधरी यांच्या मुलांनी त्यांच्या पाठीमागे लागून गणपतीच्या मूर्तीची मागणी केली. चौधरी यांनी मूर्ती करण्याची मानसिकता केली परंतु ती तांदळाचीच मूर्ती असावी ही अडचण संतोष चौधरी यांनी त्यांचे जवळचेच नातेवाईक प्रदीप भिगांर्डे यांच्या कानावर घातली.
व्यवसायाने मूर्तिकार नसतानाही खालापुरातील वावोशी येथील प्रदीप भिगांर्डे यांनी पूर्णत: तांदळापासून गणपतीची मूर्ती बनवून आपल्याला दिल्याचे चौधरी यांनी सांगितले. साधारण दीड फूट उंचीची गणपतीची मूर्ती बनविण्यासाठी सव्वा पाच किलो तांदूळ व सव्वा किलो डिंक यांचा वापर ही मूर्ती बनविण्यासाठी करण्यात आला असून ही एक मूर्ती बनवायला १५ दिवस लागल्याचे भिगांर्डे यांनी सांगितले. तांदळाच्या या गणपतीला आपण शाडू वा प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीप्रमाणे आकर्षक रु प देवू शकत नाही. तांदळाचा गणपती हा ओबडधोबड बनत असला तरी ती मूर्ती खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक असून नदी व तलावामध्ये विसर्जन केल्यास तांदळापासून माशांना अन्न ही मिळू शकते, असेही वैशिष्ट्य त्यांनी सांगितले.

Web Title: Eco-friendly Ganesh idol of rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.