इबोला व्हायरस बी अलर्ट
By Admin | Updated: August 12, 2014 01:16 IST2014-08-12T01:16:42+5:302014-08-12T01:16:42+5:30
संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित रुग्ण भारतातही आढळून आला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांना सतर्क (अलर्ट) राहण्याची सूचना केली आहे.

इबोला व्हायरस बी अलर्ट
आरोग्य विभाग सतर्क : रुग्णालयांना दिल्या सूचना
नागपूर : संपूर्ण जगात दहशत माजवणाऱ्या इबोला रोगाचा संशयित रुग्ण भारतातही आढळून आला आहे. खबरदारी म्हणून आरोग्य विभागाने शासकीय रुग्णालयांना सतर्क (अलर्ट) राहण्याची सूचना केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयानेही (मेडिकल) या संदर्भात नुकतीच बैठक घेऊन उपाययोजनांच्या सूचना दिल्या आहेत.
इबोला या रोगासंदर्भात संयुक्त राष्ट्र आरोग्य संघटनेतर्फेहाय अलर्ट जारी केला आहे. या रोगाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव हा आफ्रिका खंडातील देशात आढळून आला आहे. पश्चिम आफ्रिकन देश गिनी, सियरा लियॉन आणि लायबेरियामध्ये इबोला व्हायरसचा वाढता धोका बघता जागतिक आरोग्य संघटनेने चिंता दर्शविली आहे. विशेष म्हणजे इबोला हा व्हायरस नियंत्रणाबाहेर जात असून अन्य राष्ट्रांमध्ये देखील पसरू शकतो अशी भीती संघटनेने व्यक्त केली आहे. त्यानुसार भारतातही अलर्ट जारी केला आहे. चेन्नई विमानतळावर संशयित रुग्ण आढळून आल्याने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक यांना खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. यात संशयित रुग्ण दिसल्यास त्याचे रिपोर्र्टिंग, घ्यावयाची काळजी, दिसत असलेल्या लक्षणांवरून उपचार आदींची माहिती देण्यात आली आहे.
-मेडिकलमध्ये ‘इबोला’वर बैठक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) प्रशासनाने शनिवारी ‘इबोला’ रोगाबाबत बैठक घेतली. यात संशयित रुग्ण आढळून आल्यास वॉर्ड क्र. २५ मध्ये स्वतंत्र खोलीची व्यवस्था, आवश्यक औषधे, उपकरणे यावर चर्चा केली. तसेच बाह्यरुग्ण व आकस्मिक विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.(प्रतिनिधी)