अंतराळातून आला ‘इबोला’ रोग!

By Admin | Updated: January 14, 2015 04:43 IST2015-01-14T04:43:27+5:302015-01-14T04:43:27+5:30

जगात ‘इबोला’ तसेच इतर काही नवीन पण भयंकर रोगांमुळे दहशत आहे. याबाबत वैद्यकशास्त्राप्रमाणेच खगोलशास्त्राच्या दृष्टीनेदेखील जगभरात अभ्यास सुरू आहे.

'Ebola' disease came from the space! | अंतराळातून आला ‘इबोला’ रोग!

अंतराळातून आला ‘इबोला’ रोग!

नागपूर : जगात ‘इबोला’ तसेच इतर काही नवीन पण भयंकर रोगांमुळे दहशत आहे. याबाबत वैद्यकशास्त्राप्रमाणेच खगोलशास्त्राच्या दृष्टीनेदेखील जगभरात अभ्यास सुरू आहे. अंतराळातून धुमकेतू किंवा अशनीच्या माध्यमातून या रोगांचे जीवाणू पृथ्वीवर आले का याबाबत संशोधकांनी अभ्यासाला सुरुवात केली आहे. सध्या ही केवळ शक्यता असली तर अभ्यासाअंती वेगळा निष्कर्ष बाहेर निघण्याची बाब नाकारता येत नाही, अशी माहिती ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ.जयंत नारळीकर यांनी दिली.
केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे प्रायोजित व शिवाजी विज्ञान महाविद्यालयात आयोजित ‘इन्स्पायर’ या विज्ञान शिबिरात नारळीकरांनी विद्यार्थ्यांशी मोकळेपणाने संवाद साधला. यावेळी त्यांनी वरील माहिती दिली.
Þडॉ. नारळीकर यांनी खगोलशास्त्राच्या इतिहासापासून ते भविष्यात होऊ शकणाऱ्या घडामोडींपर्यंत निरनिराळ्या मुद्यांवर प्रकाश टाकला. इतर वैज्ञानिक शाखा पृथ्वीपर्यंत मर्यादित आहेत तर खगोलशास्त्राची झेप पृथ्वीबाहेर पसरलेल्या अमाप विश्वापर्यंत आहे. न्यूटनचा नियम पृथ्वीबाहेर कोट्यवधी किलोमीटरपर्यंत लागू होतो हे विधान फक्त खगोलशास्त्रच करू शकतो. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावण्याचे श्रेय सर आयझॅक न्यूटन यांना देण्यात येते. परंतु केवळ सफरचंद त्यांच्या डोक्यावर पडले म्हणून हा शोध लागला नाही. तर त्याअगोदर होऊन गेलेले खगोलशास्त्रज्ञ व अभ्यासक टायको व केपलर यांच्या अभ्यासातून समोर आलेल्या बाबींवर हे प्रमेय मांडण्यात आले होते असे डॉ.नारळीकर यांनी सांगितले.
नांदेडजवळ गुरुत्वाकर्षण अभ्यास
गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिका, युरोप, जपान या देशांनी अत्याधुनिक टेलिस्कोप असणाऱ्या वेधशाळा उभारल्या आहेत. रेखांशावरील स्थान लक्षात घेता भारतातदेखील अशी वेधशाळा उभारण्यास अमेरिकेने सहकार्य करण्याची तयारी दाखवली आहे. यासाठी महाराष्ट्रातील नांदेड, राजस्थान आणि मध्य प्रदेश ही ठिकाणे योग्य आहेत. यातील एकाची निवड करण्यासाठी संंबंधित प्रस्तावाला केंद्र सरकारकडे चर्चेसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. नारळीकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: 'Ebola' disease came from the space!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.