जेवणाचा बेत जिवावर बेतला
By Admin | Updated: June 7, 2016 07:43 IST2016-06-07T07:43:06+5:302016-06-07T07:43:06+5:30
रात्रीचे जेवण बाहेर करण्यासाठी आखलेला प्लॅन पाच मित्रांना भलताच महागात पडला.

जेवणाचा बेत जिवावर बेतला
मुंबई : रात्रीचे जेवण बाहेर करण्यासाठी आखलेला प्लॅन पाच मित्रांना भलताच महागात पडला. जेवणाची पार्टी उरकून कारने घरी परतत असताना, त्यांच्या कारचा अपघात झाला. या भीषण अपघातात चालकासह दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. जीवन बेर्डे (२३), चालक अतुल बनसोडे (२२) अशी मृतांची नावे आहेत, तर तिघा जखमींवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भांडुप आणि कांदिवली परिसरात राहणारे जीवन बेर्डे, सुरेश बेर्डे (३०), अतुल बनसोडे (२२), राजू वाकळे (२२) आणि रणजित बेर्डे (२३) अशी पाच मित्रांची नावे आहेत. पाचही जण चालक म्हणून काम करतात. रविवारी कांदिवली येथील रहिवासी असलेला रवी टुरिस्टच्या स्विफ्ट डिझायरने फिरत असल्याची माहिती अतुलला मिळाली. त्यानुसार, रात्री कारने जेवणासाठी बाहेर जाण्याचे त्यांनी ठरविले. ठरल्याप्रमाणे रवी कार घेऊन भांडुप परिसरात आला. अतुलकडे गाडी चालवायला देत, चारही जण ठाण्याच्या ढाब्यावर जेवणासाठी गेले. तेथे जेवणाचा बेत उरकून पाचही जण भांडुपच्या दिशेने निघाले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास फेरफटका मारत असताना अतुलने गाडी घाटकोपरच्या दिशेने नेली. अशात ठाणे-मुंबई मार्गावरील त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. गाडी समोरील खांबाला धडकून हायवेवर पलटी झाली. या अपघातात गाडीचा पूर्णपणे चुराडा झाला आहे, तर जीवन आणि अतुल जागीच ठार झाले. स्थानिक आणि घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांच्या मदतीने जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले.
>पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
यामध्ये रवीची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेने भांडुप परिसरातही शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, मित्रांमध्ये अतुलला कसलेच व्यसन नसल्याने, त्याच्याकडे गाडी चालविण्यासाठी दिली होती. त्यात हा अपघात कसा झाला, हे कळलेच नसल्याचे जखमी मित्रांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे. या प्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात अतुल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच अधिक तपास सुरूअसल्याची माहिती पंतनगर पोलिसांनी दिली.