फळे खा; पण बिया द्या!
By Admin | Updated: July 31, 2016 04:14 IST2016-07-31T04:14:00+5:302016-07-31T04:14:00+5:30
दोन महिन्यांत ४ कोटी ४० लाख फळबिया वृक्षारोपणासाठी जमा करण्यात आल्या आहेत.

फळे खा; पण बिया द्या!
मारोती जुंबडे,
परभणी- जिल्ह्याला भेडसावणाऱ्या दुष्काळाच्या दृष्टचक्रातून मुक्त करण्यासाठी नाम फाऊंडेशनच्या पुढाकारातून ‘फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या’ या उपक्रमांतर्गत दोन महिन्यांत ४ कोटी ४० लाख फळबिया वृक्षारोपणासाठी जमा करण्यात आल्या आहेत. त्यामधील ४ लाख बियांचे वृक्षारोपणही कृषीभूषण कांतराव देशमुख यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
नाम फाऊंडेशनचे कृषी विभागप्रमुख कांतराव देशमुख झरीकर यांनी आपल्या कल्पनेतून दोन महिन्यांपूर्वी ‘फळे तुम्ही खा, बिया आम्हाला द्या’ हा उपक्रम राबविण्याचे ठरविले. त्यांच्या या आवाहनाला लोकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.
पुण्यातील या कार्यक्रमातून दोन टन बिया आयोजकांनी एकत्र करून या उपक्रमास दिल्या. तेव्हापासून शाळा, महाविद्यालय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थितांना बिया देण्याचे आवाहन केले. आतापर्यंत विविध ठिकाणाहून ४ कोटी ४० लाख फळ बिया जमा झाल्या आहेत. यामध्ये सीताफळ, पेरू, सफरचंद, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी आदी फळबियांचा समावेश आहे. यामधील ४ लाख बियांचे झरी परिसरात जलयुक्त शिवारच्या करण्यात आलेल्या कामाच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे.
>असे झाले मोजमाप
जिथे-जिथे आवाहन केले तेथून फळबियांची आवक सुरू झाली. आलेल्या बियांचा हिशोब कसा ठेवायचा? हा प्रश्न समोर असताना एका किलोमध्ये किती बिया बसतात हे सर्व प्रथम पाहण्यात आले. या मोजमापात एका किलोमध्ये २ हजार ५० बिया जमल्यानंतर यावर पुढचा अंदाज लावण्यात आला.