चारा खा.. पाणी पी.. उडून जा
By Admin | Updated: May 7, 2017 04:11 IST2017-05-07T04:04:27+5:302017-05-07T04:11:14+5:30
प्रत्येक उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांसाठी पाणी-चाऱ्याची सोय करण्याचे केवळ आवाहन केले जाते़ मात्र, प्रत्यक्षात कृती करणाऱ्यांची

चारा खा.. पाणी पी.. उडून जा
- बालाजी बिराजदार -
प्रत्येक उन्हाळ्यात पशु-पक्ष्यांसाठी पाणी-चाऱ्याची सोय करण्याचे केवळ आवाहन केले जाते़ मात्र, प्रत्यक्षात कृती करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे़ याला अपवाद ठरलेय ते उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा (रवा ता़ लोहारा) गाव! एप्रिलच्या मध्यापासून या गावातील प्रत्येकाने घरांसमोर पक्ष्यांसाठी पाणी व चाऱ्याची सोय केली आहे़ मातीच्या कुंड्यात पाणी, ज्वारीची कणसे बांधल्याने भर उन्हाळ्यात या पक्ष्यांच्या चारा-पाण्याची सोय झाली आहे़
उन्हाचा पारा ४४ अंशाच्या पुढे असून, गावो-गावी पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत़ याचा फटका पशू-पक्षी व वन्य प्राण्यांनाही बसत आहे़ ही बाब लक्षात घेऊन हिप्परगा (रवा) येथील धर्मवीर जाधव, अप्पा होनाळकर, प्रदीप पाटील, करण पाटील, रविकांत गिराम आदी युवक एकत्र आले़ त्यांनी स्वखचार्तून पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी या हेतुने मातीपासून बनविलेल्या कुंड्या विकत घेतल्या. गावातील प्रत्येक घरासमोर झाडे, घरे, छपरावर या कुंड्या बांधल्या. तसेच ज्वारीची दोन कणसे बांधली. ग्रामस्थ नियमित कुंड्यामध्ये पाणी भरून ठेवत आहेत. यामुळे भर उन्हातही पक्ष्यांच्या किलबिलीने गाव आनंदाने भरुन गेलेला असतो.
लक्ष्मण कुंभारांचे लाखमोलाचे दान
गावातील मातीपासून भांडी तयार करणारे लक्ष्मण कुंभार हे थंडगार माठ खरेदी करायला येणाऱ्या ग्रामस्थाला मोफत मातीची एक कुंडी भेट देऊन पक्ष्यांसाठी घरासमोर पाणी भरून ठेवावे, असे आवाहन करीत आहेत़