ईस्टर्न एक्स्प्रेस-वे खोळंबला
By Admin | Updated: October 2, 2015 04:13 IST2015-10-02T04:13:39+5:302015-10-02T04:13:39+5:30
विक्रोळी गांधीनगर पुलावर मिक्सर टे्रलर उलटून अपघात झाला. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर तब्बल आठ तास वाहतुकीचा खोळंबा झाला.

ईस्टर्न एक्स्प्रेस-वे खोळंबला
मुंबई : विक्रोळी गांधीनगर पुलावर मिक्सर टे्रलर उलटून अपघात झाला. या अपघातामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावर तब्बल आठ तास वाहतुकीचा खोळंबा झाला. त्यामुळे ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघातात दोन जण जखमी झाले. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टे्रलरचालक शंकू कुमार प्रसाद (३५) याला अटक करण्यात आली आहे.
गांधीनगर पुलावर चढत असताना चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन आदळला आणि हा अपघात झाला. या अपघातात वंदना किरत (३५) आणि परशुराम पाटील (५२) हे दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी दाखल झालेल्या पार्कसाईट पोलिसांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे तब्बल आठ तास येथील वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे कामावर निघालेल्यांना याचा फटका बसला. मुलुंडपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांकडून तात्पुरत्या स्वरूपात मार्ग उपलब्ध करून देण्याचे काम सुरू होते. दुपारी ३च्या सुमारास येथील टे्रलर हटवून मार्गिका मोकळी करण्यात आल्याने प्रवाशांसह चालकाने सुटकेचा नि:श्वास सोडला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी दिली. टँकर उलटल्यामुळे पूर्व द्रुतगती मार्ग जणू ठप्प झाला. पुढेही जाता येत नाही आणि वाहन मागवून मागेही जायची सोय नाही, अशा परिस्थितीत प्रवासी अडकले.गांधीनगर पुलावर चढत असताना चालक प्रसाद याचा गाडीवरचा ताबा सुटल्याने तो रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेवर जाऊन आदळला. सकाळी ७च्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात इको कारसह, रिक्षा, दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.