वसुंधरेचे संवर्धन सामाजिक जबाबदारी

By Admin | Updated: April 22, 2015 04:02 IST2015-04-22T04:02:35+5:302015-04-22T04:02:35+5:30

वसुंधरा दिन दरवर्षी २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. यावर्षीदेखील अनेक देशांत, त्यातील छोट्या-छोट्या गावांत-शहरांत, अनेक सामाजिक, पर्यावरणवादी, पर्यावरण संरक्षक

Earth Conservation Social Responsibility | वसुंधरेचे संवर्धन सामाजिक जबाबदारी

वसुंधरेचे संवर्धन सामाजिक जबाबदारी

वसुंधरा दिन दरवर्षी २२ एप्रिल रोजी साजरा केला जातो. यावर्षीदेखील अनेक देशांत, त्यातील छोट्या-छोट्या गावांत-शहरांत, अनेक सामाजिक, पर्यावरणवादी, पर्यावरण संरक्षक अशा संघटना आणि संस्थांकडून जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने अनेक निरनिराळे उपक्रम आणि कार्यक्रम यांची रेलचेल असणार आहे .
वर्तमानातील प्रगतीशील वाटचालीत शहरांचे बदलते रूप, विकासाबरोबर निसर्गाची होत असलेली हेळसांड यामुळे विकासाबरोबर पर्यावरणाचे अनेक प्रश्न सामोरे येऊ लागले आहेत. जगभरातील तज्ज्ञांमध्ये हवामानातील आणि पर्यावरणातील या बदलांबाबत चर्चा सुरू आहे. हवामानातील या बदलांचे भविष्यात फार गंभीर परिणाम होऊ शकतात आणि त्यातील फारसे बदल आपल्याला दिसूही लागले आहेत.
कालानुरूप जीवसृष्टीमध्ये झालेल्या हवामान बदलांचे, वातावरणातील घटकांमध्ये झालेल्या बदलांचे प्रमाण आणि त्याचा मानवी तसेच संपूर्ण जीवसृष्टीवर होत असलेला एकंदरीत परिणाम याचा विचार आपण सर्वांनी केला पाहिजे .
वाढते औद्योगिकीकरण, वाढते प्रदूषण, हवेतील आणि जैवसंस्थेतील प्रदूषित वायूंचे आणि घटकांचे वाढते प्रमाण यामुळे वातावरणात कालानुरूप प्रतिकूल बदल होत गेले आहेत. या साऱ्याचा परिणाम मानव, प्राणी, इतर जीवसंस्था यांना आज सहन करावा लागत आहे.
वसुंधरा दिनानिमित्ताने का होईना वातावरणात आणि हवामानात घडून येणाऱ्या प्रतिकूल परिणामांची जाणीव आपल्या सगळ्यांनाच व्हावी आणि आपल्यातील प्रत्येकाने जीवसृष्टीचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करावा हाच यामागचा मूळ उद्देश आहे. जीवसृष्टीच्या आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी रानावनांना जोपासणे देखील गरजेचे आहे. नुसतं एखादंदुसरं झाड लावून काम भागणार नाही, तर जमेल तेवढी जागा वनांसाठी राखीव ठेवण्यात आली पाहिजे. त्याचसोबत जलसंचयनाचे, जलशुद्धीकरणाचे निरनिराळे उपक्रम राबवले जाणे आजच्या दृष्टीने आवश्यक आहे. हरित वायू, कार्बन डायआॅक्साइड, मिथेन, नायट्रोजनसारख्या अपायकारक वायूंचे वातावरणातील वाढणारे प्रमाण कुठेतरी आटोक्यात आणणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या वसुंधरेवरील जीवसृष्टीसाठी आवश्यक अशा पर्यावरणाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी वैयक्तिकरीत्या तसेच सामूहिक पद्धतीने प्रयत्न करायला हवेत. वसुंधरा दिन मुळात साजराच केला जातो तो म्हणजे आपली पृथ्वी, त्यावरील सगळ्या प्रकारची जीवसृष्टी, जैवविविधता, सगळ्या प्रकारचे नैसर्गिक व अनैसर्गिक, मर्यादित आणि अमर्यादित ऊर्जास्रातांचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे याकरिता.
वाढत्या प्रदूषणामुळे, बाष्पीकरणामुळे पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. हवामानात बाष्प, कार्बनडायआॅक्साइड, हायड्रोकार्बन, ट्रायफ्लोरो कार्बन, ओझोन, मिथेन यासारखे विविध वायू सामील असतात. यालाच आपण ‘ग्रीन हाऊस गॅसेस’ म्हणतो. गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणात या वायूंचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे पर्यावरणाचा एकंदरीत असलेला समतोल कुठेतरी बिघडतोय. हवामानात होणाऱ्या या बदलांना ग्लोबल वर्ॉमिंग असे म्हणतात. आज वैश्विक पातळीवर ग्लोबल वर्ॉमिंग हा अतिशय चिंंतेचा विषय झाला आहे.
वातावरणीय तापमानात होणारी वाढ, समुद्राच्या पाण्याच्या तापमानात होणारी वाढ, ऊर्जेचे वाऱ्यामुळे होणारे ध्रुवीकरण, वातावरणातील प्रदूषणात आणि अपायकारक घटकांत झपाट्याने होणारी वाढ, त्यामुळे एकूणच प्राणीमात्रांचे होणारे स्थलांतर आणि त्यांच्या जीवनावर होणारा वाईट परिणाम या साऱ्यांची मानवाला जाणीव व्हावी आणि यावर उपाययोजना करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या संघटनांनी, निसर्गप्रेमींनी आणि सामान्यांनी देखील एकत्र येऊन पावले उचलावीत, हा हेतू साध्य करण्यासाठी वसुंधरा दिन साजरा केला जातो.
पृथ्वीवरील पर्वतरांगा, भूपृष्ठावरील भौगोलिक परिस्थिती, वाऱ्यास होणारा अडथळा, पृथ्वीवरील वृक्ष, वने इत्यादी घटक त्या त्या भागातील हवामान ठरविण्यास उपयुक्त ठरत असतात. पृथ्वीच्या हवामानात होणारा बदल ही मानवी सृष्टीसह सर्वच प्राणीमात्रांसाठी अत्यंत चिंंताजनक बाब आहे. विकसित आणि विकसनशील होण्यासाठी देशांमध्ये लागलेल्या स्पर्धेत, तंत्रज्ञानाचा वापर कमी करून हरित वायूंचे उत्सर्जन कमी करणे अशक्यच वाटते. यामुळे अधिकाधिक वृक्षलागवड करून त्यांना वाढविणे आणि वातावरणात वाढणाऱ्या अपायकारक वायूंच्या उत्सर्जनाला थोपविणे हा मार्ग अवलंबला जाऊ शकतो.
हवामानातील बदल हा जीवसृष्टीसाठी धोका आहे. वातावरणातील बदलांमुळे तापमान आणि पावसाचे प्रमाण यांमध्येही बदल होतात, ज्याचा सरळ परिणाम शेती व्यवसायावर आणि पिकांवर होतो. तीव्र हवामान, खूप जास्त उष्णता, खूप जास्त पाऊस, दुष्काळ या साऱ्याचा परिणाम प्राणीजीवांवर होतोच, हे आपल्याला माहीत आहे. हवामानातील या बदलांचा परिणाम हिमखंड आणि हिमनद्या वितळण्यात देखील होऊ शकतो, ज्यामुळे परिणामी समुद्राच्या, महासागराच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन येत्या काही काळात वादळे आणि चक्रीवादळांचा मोठ्या प्रमाणावर सामना करावा लागण्याची शक्यता टाळता येत नाही.
देशभरातच आपण वातावरणातील बदलांमुळे होणारे दुष्परिणाम बघत आहोत. अलीकडेच राज्यात अकाळी पावसामुळे शेती व्यवसायाचे भरपूर नुकसान झाले आहे.
ग्लोबल वर्ॉमिंगचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर देखील होऊ शकतो. ग्लोबल वर्ॉमिंगमुळे उष्माघात, डिहायड्रेशन, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत बिघाड, कुपोषण अशा आरोग्याला हानिकारक ठरणाऱ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो. त्याचप्रमाणे, वन्य जिवांच्या, प्राणीमात्रांच्या तसेच वृक्षांच्या अनेक जाती-प्रजाती यामुळे नष्ट होण्याची भीती आहे. या साऱ्याला योग्य वेळी आळा घालण्यासाठी आपल्यातील प्रत्येकाने संपूर्ण जीवसृष्टीप्रती आपल्या जबाबदारीची जाणीव ओळखून त्याप्रमाणे पावले उचलणे आवश्यक आहे.
जीवसृष्टीचे आणि पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन किंंवा प्रदूषण नियंत्रण ही केवळ कायद्याच्या माध्यमातून शासनाने नियंत्रित करण्याची बाब राहिलेली नाही. याकरिता शासन सर्वसामान्य नागरिक व समाजातील विविध घटक संस्था यांनी सकारात्मक भूमिकेतून एकत्र येऊन प्रदूषण नियंत्रणाशी अथवा ग्लोबल वर्ॉमिंगला आळा घालण्यासाठी संघटितपणे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
निसर्ग आणि मानव यातील नातेसंबंध समजून घेऊन स्थानिक पर्यावरणाशी निगडीत विविध समस्या प्रत्यक्ष सहभागाद्वारे समजावून घेऊन स्थानिक पातळीवर नैसर्गिक संसाधनांच्या विस्थापनातून स्थानिक लोकांच्या सहभागाने प्रत्यक्ष कृतीकार्यक्रम राबविण्यासाठी उपाययोजना राबविणे उपयुक्त ठरू शकतात. त्याचबरोबर अशासकीय संस्था, पत्रकार किंंवा पर्यावरण क्षेत्रात काम करणारे संशोधक समृद्ध पर्यावरणाच्या चळवळीकरिता शासन, सर्वसामान्य नागरिक व समाजातील विविध घटक संस्था यांनी सकारात्मक भूमिकेतून एकत्र येऊन, प्रदूषण नियंत्रणाशी अथवा ग्लोबल वर्ॉमिंगला आळा घालण्यासाठी संघटितपणे काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्या अवतीभोवती असणाऱ्या आपल्याच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अनेक पर्यावरणवादी जागरूक संस्था पर्यावरणाविषयी जनजागृती करीत असताना, विविध उपक्रम आणि यशस्वी उपाययोजना हाती घेत असताना जनतेचा देखील योग्य सहभाग आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आवश्यक आहे. असे झाल्यास आपण भविष्यातील समृद्ध आणि संपन्न अशा पर्यावरणाचे पाईक ठरू यात शंका नाही.
(संपादकीय समन्वय : ध्रुव कम्युनिकेशन्स)

Web Title: Earth Conservation Social Responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.