ई-बसमधून देताहेत ई-लर्निंगचे धडे
By Admin | Updated: May 26, 2014 02:41 IST2014-05-26T02:41:57+5:302014-05-26T02:41:57+5:30
माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

ई-बसमधून देताहेत ई-लर्निंगचे धडे
सचिन धर्मापुरीकर, कोपरगाव - माहिती-तंत्रज्ञानाच्या जोरावर भारत महासत्ता होण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्यामुळे हेच माहिती-तंत्रज्ञान तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजे ही निकड ओळखून संजीवनी फाउंडेशनने सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ‘ई-बस’ ही नवी संकल्पना घेऊनत्यांनी संगणक विद्यार्थ्यांच्या दारातच नेऊन ठेवले आहे, तेही मोफत. आतापर्यंत १७ शाळांमधील १३०० विद्यार्थी संगणक साक्षर झाले आहे़ ‘संजीवनी तंत्रज्ञान आपल्या दारी, चला करू या मैत्री तंत्रज्ञानाशी’ हे ब्रिद घेऊन सहा महिन्यांपूर्वी संजीवनी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या संकल्पनेतून ई-बसचा जन्म झाला़ वीस लॅपटॉप, प्रोजेक्टर, इंटरनेट कनेक्शन असा कॉम्प्युटर लॅबसारखा सेटअप असलेली ‘संजीवनी ई-बस’ सज्ज झाली़ प्रा़ वैभव परजणे यांच्यावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याची जबाबदारी टाकण्यात आली़ आठवी, नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना बेसिक कॉम्प्युटर आॅपरेशन, वर्ड, पॉवर पॉइंट, हार्डवेअरची माहिती, ई-मेल अकाउंट तयार करणे, इंटरनेटवर एखाद्या विषयाची माहिती उपलब्ध करून घेणे याबाबतची माहिती ‘संजीवनी ई-बस’च्या माध्यमातून दिली जाते़ आजवर कोपरगाव तालुक्यातील १७ शाळांमधील १३०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यात आले तेही मोफत़ पाठ्यपुस्तकाशिवाय संगणकाचे ज्ञान मिळाल्याने विद्यार्थी व त्यांचे पालक खूश आहेत़ इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आयसीटी हा विषय आहे़ परंतु ग्रामीण भागातील शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाहीत़ त्यामुळे ‘संजीवनी ई-बस’चा फायदा विद्यार्थ्यांना होतो आहे़