यंदापासून सर्वच प्रश्नपत्रिकांची ई-डिलिव्हरी
By Admin | Updated: July 12, 2016 20:15 IST2016-07-12T20:15:30+5:302016-07-12T20:15:30+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांपासून सर्वच परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची परीक्षा केंद्रांवर थेट ई-डिलिव्हरी करण्यात येणार आहे.

यंदापासून सर्वच प्रश्नपत्रिकांची ई-डिलिव्हरी
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 12 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांपासून सर्वच परीक्षांच्या प्रश्नपत्रिकांची परीक्षा केंद्रांवर थेट ई-डिलिव्हरी करण्यात येणार आहे. उन्हाळी परीक्षांत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांची या पद्धतीने डिलिव्हरी करण्यात आली होती. यात यश मिळाल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यापीठावर येणारा ताण तसेच आर्थिक खर्च वाचणार आहे.
राज्यातील विद्यापीठांमधील शिक्षणाचा दर्जा वाढावा व जास्तीत जास्त प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर व्हावा याकरीता राज्य शासनाने राजेश अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची स्थापना केली होती. या समितीने केलेल्या शिफारसींनुसार आयटी रिफॉर्म्ससाठी विद्यापीठाकडून प्रयत्न सुरू झाले. परीक्षा प्रणालीला ह्यआॅनलाईनह्ण स्वरुप आले असून परीक्षा अर्ज भरणे, निकाल लावणे, मूल्यांकन इत्यादी गोष्टी आॅनस्क्रीन व आॅनलाईन करण्यात येत आहे. त्याहून समोर जात प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर आॅनलाईन पद्धतीने पोहोचविण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुरुवातीला केवळ अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी हा प्रयोग राबविण्यात आला. यात कुठलाही अडथळा आला नाही व सुरळीतपणे परीक्षा पार पडली. या प्रक्रियेचे फायदे लक्षात घेता विद्यापीठाने हिवाळी परीक्षांपासून सर्वच अभ्यासक्रमाच्या प्रश्नपत्रिकांचे थेट ई-डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी दिली.
पेपरच्या दिवशी सकाळी मिळणार पासवर्ड
ज्या दिवशी पेपर असेल तेव्हा सकाळी ७.३० वाजता लॉगिन आयडी व पासवर्ड देण्यात येतील. हा पासवर्ड प्रत्येक वेळी वेगवेगळा असेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधित अधिकाऱ्याच्या चेहऱ्याचे स्कॅनिंग होऊनच अकाऊंट उघडू शकेल. सकाळी ८.३० वाजता महाविद्यालयाला प्रश्नपत्रिका मिळेल. संबंधित प्रणाली ही अतिशय सुरक्षित असून पेपर फुटण्याची कुठेही शक्यता नाही. समजा परीक्षा केंद्रावरील संबंधित अधिकारी काही आकस्मित कारणांमुळे पेपरच्या दिवशी पोहोचू शकला नाही तर काय करायचे याबाबत विद्यापीठाकडून आपत्कालीन आराखडा तयार करण्यात आला आहे.