मुंबई - राज्यातील एक लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या निर्णयामुळे राज्यातील लहान-मोठ्या शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सीचा स्वस्त पर्याय लवकरच उपलब्ध होणार आहे.
शहरांमध्ये ई-बाइक टॅक्सी सुरू करण्याबाबत रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींनुसार नवे धोरण लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. यातून मोठी रोजगारनिर्मिती होणार असून महिला चालकांनादेखील प्रोत्साहित केले जाणार आहे.
ॲप आधारित सेवाई-बाइक टॅक्सी सेवा ॲप आधारित असेल. यासाठी कंपनीला इलेक्ट्रिक बाइक वापराव्या लागणार आहेत. त्या पिवळ्या रंगात रंगवलेल्या असतील. बाइकला जीपीएस, संकटकालीन संपर्क सुविधा, वेग पडताळणी, चालक व प्रवासी या दोन्हींकरिता विमा संरक्षण असणार आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी चालक आणि प्रवाशांमध्ये सेपरेशन असणार आहे.