धुळीचे वादळ अजूनही मुंबईवरच, पुन्हा जोर वाढणार
By Admin | Updated: April 7, 2015 04:47 IST2015-04-07T04:47:25+5:302015-04-07T04:47:25+5:30
आखाती देशांत उठलेल्या वाळूच्या वादळाचा विपरीत परिणाम म्हणून महामुंबई प्रदेशावर रविवारी पसरलेल्या वाळूच्या वादळाच्या कणांचा प्रभाव सोमवारी

धुळीचे वादळ अजूनही मुंबईवरच, पुन्हा जोर वाढणार
मुंबई : आखाती देशांत उठलेल्या वाळूच्या वादळाचा विपरीत परिणाम म्हणून महामुंबई प्रदेशावर रविवारी पसरलेल्या वाळूच्या वादळाच्या कणांचा प्रभाव सोमवारी काहीसा ओसरला असला तरी मंगळवारसह बुधवारी त्यांचा जोर आणखी वाढेल, अशी भीती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
परिणामी, आणखी दोन दिवस मुंबई प्रदेशावर धुळीचे कण हवेत राहणार असून, त्याने नागरिकांना श्वसनाच्या विकारांना सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे.
गेल्या आठवड्यातील गुरुवारी दुबईमध्ये वाळूचे वादळ उठले. या वादळाने येथील जनजीवन विस्कळीत केले. ज्या वेगाने हे वादळ उठले, त्याच वेगाने ते शमलेदेखील. परंतु वातावरणात पसरलेले वाळूचे कण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि गुजरातच्या किनारपट्टीलगत वाहून आले; आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून मुंबई, ठाणे, वाशी, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवडसह
पश्चिम महाराष्ट्रावरील वातावरणात वाळूच्या कणांचा दाट स्तर जमा झाला.
वाळूच्या कणांचा हा स्तर अत्यंत दाट असल्याने या सगळ्या प्रदेशांमध्ये अंधूक वातावरण निर्माण झाले होते. आणि पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गासह मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. सोमवारी सकाळच्या तुलनेत दुपारी शहरातल्या वातावरणात पुन्हा अंधूक परिस्थिती निर्माण झाली. (प्रतिनिधी)