दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच?
By Admin | Updated: October 2, 2015 03:59 IST2015-10-02T03:59:14+5:302015-10-02T03:59:14+5:30
शिवसेनेने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्याने दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानातच साजरा केला जावा याकरिता सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत.

दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच?
मुंबई : शिवसेनेने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले असल्याने दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क मैदानातच साजरा केला जावा याकरिता सरकारच्या वतीने प्रयत्न सुरू आहेत. न्यायालयात त्याकरिता राज्याचे अॅडव्होकेट जनरल अर्ज करणार आहेत.
धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमाकरिता मैदाने देण्याची तरतूद सरकारने कायद्यात केली असून वर्षभरात ४५ दिवस मैदाने दिली जाऊ शकतात. हे ४५ दिवस कोणते असावेत याबाबत लोकांकडून हरकती व सूचना मागवून वर्षाच्या प्रारंभी निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. लोकांकडून अशा सूचना मागवण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. मात्र अंतिम निर्णय होणे बाकी असल्याने या वर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान उपलब्ध करून द्यावे, असा अर्ज राज्याचे अॅडव्होकेट जनरल मुंबई उच्च न्यायालयात करणार आहेत. कायद्यात सार्वजनिक कार्यक्रमाकरिता मैदान देण्याची तरतूद असल्याने ही विनंती मान्य झाल्यास शिवसेनेचा मेळावा शिवाजी पार्कवर सादर होईल, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेचा दसरा मेळावा सातत्याने शिवाजी पार्कवरच होत आहे. मध्यंतरी खेळाची मैदाने खेळाखेरीज अन्य उपयोगाकरिता देण्यास विरोध करणारी याचिका केली गेल्याने दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेण्याची परंपरा खंडित होण्याची
शक्यता निर्माण झाली होती.