‘शिफ्टिंग’दरम्यान सामान पळविणारे अमरावती पोलिसांच्या जाळ्यात
By Admin | Updated: August 12, 2014 01:04 IST2014-08-12T01:04:17+5:302014-08-12T01:04:17+5:30
नागपूर केंद्रीय पोलीस दलातील (सीआरपीएफ) उपनिरीक्षकाचा विश्वासघात करुन त्यांचे लाखो रुपयांचे घरगुती सामान पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना रविवारी पोलिसांनी अटक केली. अमरावतीच्या

‘शिफ्टिंग’दरम्यान सामान पळविणारे अमरावती पोलिसांच्या जाळ्यात
नागपूर येथील घटना : केंद्रीय पोलीस दलातील उपनिरीक्षकाची फसवणूक
अमरावती : नागपूर केंद्रीय पोलीस दलातील (सीआरपीएफ) उपनिरीक्षकाचा विश्वासघात करुन त्यांचे लाखो रुपयांचे घरगुती सामान पळवून नेणाऱ्या दोन आरोपींना रविवारी पोलिसांनी अटक केली. अमरावतीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कामगिरी केली. फिरोज खान नूर खान (२७, जाहीदनगर, अमरावती) व मो. नाझीम मो. इलियास (५२, रा. बिसमिल्लानगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
दिनदयाल यादव हे नागपूर येथील केंद्रीय पोलीस दलात कार्यरत होते. त्यांचा मुक्काम पोलीस वसाहतीत होता. बंगळूर येथे बदली झाल्यामुळे त्यांना त्यांचे घरातील सामान बंगळूरला न्यायचे होते. त्यासाठी त्यांनी ट्रान्सपोर्ट व्यवसायी फिरोज खान याच्याशी संपर्क साधला. ठरल्याप्रमाणे फिरोजने टाटा एस क्रमांक एम.एच.२७ एक्स ४७२४ चा चालक मो.नाझीम याला नागपूर येथे सामान आणण्यासाठी पाठविले. १६ जुलै रोजी यादव यांच्या घरुन दुचाकी, फ्रीज, दिवाण, २ सीआरपीएफ कंपनीच्या बॉक्स कीट, खुर्ची, टेबल, टी.व्ही. कुलर इत्यादी अंदाजे अडीच लाख रुपये किंमतीचे सामान टाटा एस. गाडीत भरून अमरावतीकडे रवाना झाले. अमरावतीहून हे सामान ट्रकने बंगळूर येथे पाठविण्याचे ठरले होते. परंतु हे सामान बंगळूर येथे पोहचलेच नाही. यादव यांनी फिरोज खान सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा भ्रमणध्वनी बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यादव यांनी ४ आॅगस्ट रोजी नागपूर येथील सोनेगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी फिरोज खान व मो.नाझीम यांच्याविरुद्ध विश्वासघात केल्याप्रकरणी कलम ४०८ नुसार गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी अमरावतीत असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळताच त्यांनी रविवारी अमरावती पोलिसांना सूचना दिली. अमरावती पोलिसांनी याप्रकरणाचा शिताफीने तपास करुन आरोपी मो. नाझीन व मुख्य सूत्रधार फिरोज खान याला रविवारी रात्री उशिरा अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी टाटा एस. वाहन जप्त केले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनात गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्ये, गणेश काळे, सुभाष पटील, पंकज यादव, संतोष शिखरे, दीपक दुबे, संजय धंदर यांनी केली.