कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाला तडे
By Admin | Updated: August 24, 2016 03:25 IST2016-08-24T03:25:09+5:302016-08-24T03:25:09+5:30
लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी देवीचे मंदिर वसलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजांना तडे गेल्याने तो ढासळण्याच्या बेतात आहे.

कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाला तडे
मुरलीधर भवार,
कल्याण- कल्याणची ओळख असलेल्या व लक्षावधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी देवीचे मंदिर वसलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजांना तडे गेल्याने तो ढासळण्याच्या बेतात आहे. दुर्गाडी देवीच्या मंदिराचा पाया घुशी आणि उंदीरांनी पोखरला आहे. वेळीच दुरुस्ती केली नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते, असे स्थानिकांचे मत आहे. मात्र ज्या जिल्हाधिकारी कार्यालयाने याची दखल घ्यायची ते या दुरवस्थेकडे काणाडोळा करीत असल्याचाही आरोप केला जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा आरमाराची स्थापना दुर्गाडी देवीच्या साक्षीने केली. तसेच १९५६ साली शिवाजी महाराजांनी कल्याण, भिवंडी आणि सूरत जिंकली. त्यावेळी दिवाळीचा दिवस होता. शिवाजी महाराजांच्या साक्षीने किल्ले दुर्गाडीवर दिवाळी मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरात एक शिळा आहे. तीच देवीची मूळ मूर्ती आहे. पुरातन काळी त्याचीच पुजा देवीचे भक्त करीत होते. नगरपालिकेच्या काळात तत्कालीन नगराध्यक्ष ना. का. अहिर यांनी दुर्गाडी किल्ल्यावर देवीचे मंदिर बांधले. सध्याचे तेच ते मंदिर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी याठिकाणी देवीची पूजा बांधली होती. दुर्गाडी किल्ल्यावर बकरी ईदच्या दिवशी हिंदूना प्रवेश नाकारला जात असल्याच्या निषेधार्थ दिवंगत आनंद दिघे यांनी घंटानाद आंदोलन केले होते. आजही बकरी ईदच्या दिवशी शिवसैनिक घंटानाद करतात. मंदीर महापालिका हद्दीत असले तरी त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी कार्यालयास दिला आहे. दुर्गाडी नवरात्र उत्सव समिती व शिवसेना शहर शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुरुस्तीकरिता सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय दुर्लक्ष करीत आहे. १५ वर्षापूर्वी दुर्गाडीचे दोन्ही बुरुज ढासळण्याची घटना घडली होती. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची वाट न पाहता शिवसैनिकांनी बुरुजाची दुरुस्ती श्रमदानातून केली. त्याला तत्कालीन पोलीस उपायुक्त छेरिंग दोरजे यांनी अटकाव करीत ५६ शिवसैनिकांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. दहा वर्षापूर्वी दुर्गाडीच्या दुरुस्ती देखभालीवर काही निधी जिल्हाधिकाऱ्यांनी खर्च केला.
शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की, यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्याची दखल जिल्हाधिकारी घेत नाही.
>पावसाळयात मंदिराचे छत गळते आहे. मंदिराचा पाया उंदीर व घूशींनी पोखरला आहे. बुरुजाला तडे गेले आहेत. दोन वर्षापूर्वी माजी सेना नगरसेविका समीधा बासरे यांनी मंदिर देखभालीसाठी ठराव केला.या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कोणताही पाठपुरावा केला नाही. त्यामुळे मंदिर व किल्ला यांची दुरुस्ती व देखभाल रखडलेली आहे.वास्तविक पाहता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या कामासाठी निधी मंजूर करुन दुर्गाडी मंदिर व किल्ले यांची दुरुस्ती व देखभाल करण्याचे काम हाती घेणे आवश्यक आहे.