शीळ उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीपासून दिलासा
By Admin | Updated: March 14, 2015 05:30 IST2015-03-14T05:30:52+5:302015-03-14T05:30:52+5:30
महापे येथून कल्याण, डोंबिवली परिसराला जोडणाऱ्या मार्गावर एमएमआरडीएने उभारलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला

शीळ उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीपासून दिलासा
नवी मुंबई : महापे येथून कल्याण, डोंबिवली परिसराला जोडणाऱ्या मार्गावर एमएमआरडीएने उभारलेला उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. सुमारे १ किमी लांबीच्या या पुलामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडी टळणार आहे.
नवी मुंबईला कल्याण, डोंबिवली व अंबरनाथ परिसराशी जोडणाऱ्या महापे - शीळ मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या सतावत होती. एमएमआरडीएने ९० कोटी रुपये खर्चून १.१२ किमी लांबीचा हा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. टोलमधून हलकी वाहने वगळता यावीत व टोलच्या ठिकाणी कोंडी टाळावी यासाठी ई-टोल याकरिता सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई-पुणे महामार्गामुळे दोन शहरांतील अंतर अवघ्या तीन तासांचे झाले आहे. हे अंतर अधिक अर्ध्या तासाने कमी करण्यासाठी लोणावळा येथे १२ किमी अंतराच्या बोगद्याला मंजुरी मिळाली असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. वाहतुकीची कोंडी टळणार असल्याने उड्डाणपुल नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी आमदार संदीप नाईक म्हणाले. ठाणे - बेलापूर मार्गावर लवकरच पावणे, लोकमत जंक्शन व घणसोली येथे नवे तीन पूल प्रस्तावित असल्याचेही त्यांनी सांगितले. पावणे येथे सविता केमिकल लगतच्या मार्गावर एकेरी वाहतूक असल्याने होणारी कोंडी टाळण्यासाठी तेथे दुहेरी वाहतूक सुरू करण्याची मागणीही त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. या प्रसंगी कार्यक्रमास महापौर सागर नाईक, खासदार राजन
विचारे, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त संजीव शेट्टी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)