सहिष्णुतेमुळेच मानवी हक्कांचे रक्षण होईल
By Admin | Updated: December 11, 2015 01:58 IST2015-12-11T01:58:18+5:302015-12-11T01:58:18+5:30
राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली

सहिष्णुतेमुळेच मानवी हक्कांचे रक्षण होईल
मुंबई : राज्याचा समतोल विकास साधताना समाजातील प्रत्येक घटकाला जगण्याची आणि विकासाची समान संधी मिळायला हवी. प्रत्येकाने एकमेकांशी वागताना सहिष्णुता बाळगली, तर मानवी हक्कांचे योग्य संरक्षण होईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गुरुवारी केले. मानवी हक्क संरक्षण दिनानिमित्त सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते.
राज्य मानवी हक्क आयोगाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी मानवी हक्कांची आवश्यकता आहे. मूल्यवर्धीत शिक्षण व्यवस्थेने असा सर्वांगीण विकास साधता येईल. गरिबी हा समाजातील मानवी हक्कांची पायमल्ली करणारा सर्वात मोठा अडथळा आहे. गरिबीचे मुळापासून उच्चाटन करणे, हे आपले प्राथमिक कर्तव्य असले पाहिजे. जेणेकरून प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील.
असंघटित क्षेत्रातील कामगार, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुली आणि महिला यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केल्यास खऱ्या अर्थाने मानवी हक्कांची जोपासना होईल,’ असे सांगून ते पुढे म्हणाले की, ‘जगातील मानवतावादाला सुरक्षा महत्त्वाची असून, मानवी हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संयुक्त नीतीचा वापर करावा लागेल.
>>>> हवामानातील अनियमितता, नैसर्गिक आपत्ती, जागतिक वातावरणतील बदल, यांचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत आहे. चेन्नईमध्ये होणारी अतिवृष्टी आणि मराठवाड्यातील कोरडा दुष्काळ, यासारख्या नैसर्गिक आपत्ती या मानवासमोरील खूप मोठे आव्हान आहे. या समस्यांना तोड देण्यासाठी मानवी मूल्यांची जोपासना करणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मानवी हक्क संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भात उपस्थितांनी प्रतिज्ञा करत शपथ घेतली.