एसटी चालकामुळे दरड कोसळल्याचे झाले उघड
By Admin | Updated: July 30, 2014 18:21 IST2014-07-30T15:04:05+5:302014-07-30T18:21:47+5:30
एसटीचालकाला नेहमीच्या रस्त्याऐवजी फक्त मातीचा मोठ्ठा ढिगारा आणि त्याखाली दाबली गेलेली घरे दिसली. त्याने प्रसंगावधान राखत स्थानिक प्रशासनाला लगेच या दुर्घटनेची माहिती दिली.

एसटी चालकामुळे दरड कोसळल्याचे झाले उघड
>ऑनलाइन टीम
पुणे, दि . ३० - पहाटेच्या सुमारास माळीण गावचे रहिवासी शांत झोपेत असतानाचा काळाने त्यांच्यावर घाला घातला, मुसळधार पावसामुळे अख्खा डोंगरकडा गावावर कोसळला आणि सर्वजण ढिगा-याखाली गाडले गेले. कित्येक तास उलटूनही या घटनेचा कोणालाच पत्ता नव्हता. मात्र गावातील एसटी चालकामुळे ही दुर्घटना उघडकीस आली आणि सुरू झाला मदतीचा ओघ.... बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास माळणची एसटी गावात आली, पण एसटीचालकाला नेहमीच्या रस्त्याऐवजी फक्त मातीचा मोठ्ठा ढिगारा आणि त्याखाली दाबली गेलेली घरे दिसली. त्याने प्रसंगावधान राखत स्थानिक प्रशासनाला लगेच या दुर्घटनेची माहिती दिली.
प्रशासन व आजूबाजूच्या गावातील गावक-यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि ढिगा-याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर बचावपथकाच्या अधिका-यांना पाचारण करण्यात आले. सध्या जेसीबी, पोकलेनने ढिगारे बाजूला काढण्याचे काम सुरु असून रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आत्तापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.