रिक्षातील स्मार्टकार्डमुळे प्रवाशाचा लॅपटॉप पुन्हा मिळाला
By Admin | Updated: September 7, 2015 09:04 IST2015-09-07T01:51:52+5:302015-09-07T09:04:41+5:30
स्वप्नाली लाड प्रकरणानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने ठाण्यातील रिक्षांमध्ये चालकाची माहिती देणारे स्मार्टकार्ड बसविले आहे. याच स्मार्टकार्डमुळे तसेच महिला

रिक्षातील स्मार्टकार्डमुळे प्रवाशाचा लॅपटॉप पुन्हा मिळाला
ठाणे : स्वप्नाली लाड प्रकरणानंतर ठाणे शहर वाहतूक शाखेने ठाण्यातील रिक्षांमध्ये चालकाची माहिती देणारे स्मार्टकार्ड बसविले आहे. याच स्मार्टकार्डमुळे तसेच महिला प्रवाशाने दाखविलेल्या तत्परतेमुळे शुक्रवारी एका प्रवाशाचा लॅपटॉप परत मिळाला.
रामराज कोरी हे त्यांचा मुलगा रोनाल याच्यासह श्रीरंग सोसायटी येथून विजयवाडी, घोडबंदर येथे रिक्षाने पोहोचले. दोघेही घाईत असल्यामुळे त्यांच्याकडील बॅग रिक्षातच राहिली. या बॅगमध्ये त्यांच्या कार्यालयाची महत्त्वाची कागदपत्रे तसेच लॅपटॉपही होता. ते उतरल्यानंतर त्याच रिक्षात एक महिला प्रवासी तिथेच बसली. ही बॅग तिच्या निदर्शनास आल्यावर तिने या बॅगची रिक्षाचालकाकडे विचारपूस केली. तेव्हा, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. या महिलेने रिक्षातील स्मार्टकार्डवरूनच या चालकाचे नाव आणि पत्ताही घेतला होता. ज्या ठिकाणाहून कोरी उतरले, तिथल्या सुरक्षारक्षकाकडे या रिक्षाचा क्रमांक त्या महिलेने दिला. दरम्यान, कोरी यांनीही ही बॅग हरवल्याची तक्रार वाहतूक शाखेत दिली होती. ही तक्रार दाखल झाल्यानंतर रिक्षाच्या क्रमांकावरून रिक्षामालकाचा शोध ‘स्मार्ट आयडी’च्या साहाय्याने लावण्यात आला. रिक्षाचालक शांताराम जाधव यांच्याकडे याबाबत चौकशी केल्यानंतर ही बॅग राहिल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांनी ही बॅग वाहतूक शाखेच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांच्याकडे आणून दिली. त्यानंतर, बॅगचे मूळ मालक कोरी यांना ओळख पटवून ती सुपूर्द करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)