उदयनराजेंच्या निषेधार्थ जावळी तालुक्यात कडकडीत बंद
By Admin | Updated: February 22, 2017 16:26 IST2017-02-22T16:26:44+5:302017-02-22T16:26:44+5:30
राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये मंगळवारी खर्शी, ता. जावळी येथे धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता

उदयनराजेंच्या निषेधार्थ जावळी तालुक्यात कडकडीत बंद
ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. 22 : राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव मानकुमरे व खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांमध्ये मंगळवारी खर्शी, ता. जावळी येथे धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकावर गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर मानकुमरे यांच्या समर्थकांनी मंगळवारी जावळी तालुका बंदचे आवाहन केले होते. त्याला जावळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन कडकडीत बंद पाळला.
खासदार उदयनराजे यांचे समर्थक जावळीमध्ये या बंद काळात जाऊ नये म्हणून सातारा पोलिसांनी मोळाचा ओढा येथे चेक पोस्ट उभारून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली होती. युवकांचे टोळके गाडीमध्ये आढळल्यानंतर पोलिस संबंधित युवकांकडे कसून चौकशी करत होते. गाडीतल्या प्रत्येकाकडे कुठे चालला आहेस याची चौकशी करून खात्री जमा केल्यानंतरच त्यांना सोडून देण्यात येत होते. तर जावळीमध्ये दुकाने, बाजारपेठमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. मेडिकल, कॉलेज वगळता सर्व ठिकाणी बंद पाळण्यात आला होता.
चौकाचौकात नागरिक जमू लागले होते. मात्र, पोलिसांनी संबंधितांना हुसकावून लावले. दिवसभर मेढा बाजारपेठेमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. मंंगळवारी खर्शी येथे घडलेल्या घटनेच्या परस्पर तक्रारी वरून दोन्ही गटांकडील नऊजणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे.