‘स्वामित्व’ संपल्याने दुर्मीळ ग्रंथांची लयलूट!

By Admin | Updated: January 18, 2015 01:09 IST2015-01-18T01:09:25+5:302015-01-18T01:09:25+5:30

मरणोपरांत साठी ओलांडलेल्या लेखकांची पुस्तके ‘स्वामित्व हक्क’ कायद्यातून सुटल्याने आता कमी किमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत.

Due to the 'ownership' of the scandalous books! | ‘स्वामित्व’ संपल्याने दुर्मीळ ग्रंथांची लयलूट!

‘स्वामित्व’ संपल्याने दुर्मीळ ग्रंथांची लयलूट!

नरेंद्र रानडे ल्ल सांगली
मरणोपरांत साठी ओलांडलेल्या लेखकांची पुस्तके ‘स्वामित्व हक्क’ कायद्यातून सुटल्याने आता कमी किमतीत उपलब्ध होऊ लागली आहेत. मागील काही महिन्यांपासून मराठी पुस्तक विश्वात सुरू असलेल्या ‘किंमत युद्धा’मागे हेच कारण आहे. मात्र हे युद्ध वाचकांसाठी पर्वणीच ठरत आहे.
ज्या लेखकांच्या निधनाला साठ वर्षे होऊन गेली आहेत, त्यांची पुस्तके ‘स्वामित्व हक्का’च्या (कॉपीराईट) कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने ती छापण्याची मुभा कोणत्याही प्रकाशकास मिळाली आहे. त्यामुळेच नामवंत लेखकांच्या साहित्यकृतींच्या किमतीवरून चढाओढ सुरू झाली असून, सध्या साने गुरुजी, ना.सी. फडके, लक्ष्मीबाई टिळक, ह.ना. आपटे, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर आदी लेखकांच्या पुस्तक विक्रीमध्ये हे युद्ध पाहायला मिळते.
‘किंमत युद्ध’ नसतानाही साहित्य संमेलनांतील ग्रंथ प्रदर्शनात पुस्तक विक्रीने कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली आहेत. त्यात सामान्यांना न परवडणाऱ्या ‘बेस्ट सेलर्स’चा
वाटा मोठा होता. हल्ली साहित्य संमेलनांशिवायही भरणाऱ्या विविध ग्रंथ प्रदर्शनांतून पुस्तके सहजपणे वाचकांच्या हाती जाऊ लागली आहेत. ‘किंमत युद्धा’मुळे
साहित्य संमेलनांतील प्रदर्शनात आणि अशा
ग्रंथ प्रदर्शनांत कमी किमतीत मिळणाऱ्या पुस्तकांची विक्री मोठ्या प्रमाणावर झाल्याचे दिसून येत आहे.

एकाच लेखकाचे पुस्तक सध्या विविध प्रकाशकांमार्फत विक्रीस उपलब्ध आहे.
एका लेखकाचे एखादे पुस्तक जर ५० रुपयांत विक्रीस उपलब्ध असेल, तर तेच पुस्तक दुसऱ्या प्रकाशकातर्फे २०० ते २५० रुपये या किमतीतही उपलब्ध आहे.
साने गुरुजी, ना.सी. फडके, लक्ष्मीबाई टिळक, ह.ना. आपटे, लोकमान्य टिळक, स्वा. सावरकर या नामवंतांची पुस्तके कमी किमतीत उपलब्ध झाली आहेत.
‘किंमत युद्धा’मुळे अडीचशे ते चारशे पानांची पुस्तकेही ३० ते ५० रुपयांत उपलब्ध आहेत.

पुस्तक विश्वात स्पर्धा नको
पुस्तक विश्वात सुरू असलेले ‘किंमत युद्ध’ योग्य नाही. थोर लेखकांच्या पुस्तकांच्या छपाईचा दर्जा चांगलाच असला पाहिजे. अक्षराचा आकार, कागदाचा प्रकार, पुस्तक बांधणी यावर प्रकाशकाने लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेणेकरून ती काही वर्षांनी खराब न होता वर्षानुवर्षे वाचकांच्या
घरात राहतील. टिकाऊपणाच्या मुद्द्यावर कोणती पुस्तके किती किंमत देऊन विकत घ्यायची, याचा निर्णय वाचकांनीच घ्यावा.
- सुनील मेहता,
पुस्तक प्रकाशक, पुणे

‘किंमत युद्ध’ आवश्यक
पुस्तक विश्वात सुरू असलेले ‘किंमत युद्ध’ गरजेचे आहे. या प्रकारामुळे वाचकांना एकाच लेखकाचे अनेक प्रकाशकांनी छापलेले कोणते पुस्तक निवडायचे याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याच्या खिशाला परवडेल त्या किमतीत उपलब्ध असणारे पुस्तक विकत घेण्याचा पर्याय ‘किंमत युद्धा’मुळे मिळाला आहे आणि तो महत्त्वाचा आहे.
- त्रिलोकनाथ जोशी,
पुस्तक विक्रेते, सांगली

Web Title: Due to the 'ownership' of the scandalous books!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.