पैसे न भरल्याने आदिवासींचे वसतिगृह रखडले
By Admin | Updated: September 5, 2016 03:34 IST2016-09-05T03:34:55+5:302016-09-05T03:34:55+5:30
आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे येथे वसतिगृहाची जागा निश्चित करण्यात आली

पैसे न भरल्याने आदिवासींचे वसतिगृह रखडले
ठाणे : आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी ठाणे येथे वसतिगृहाची जागा निश्चित करण्यात आली आहे. सुमारे २० कोटी रुपये किमतीच्या या जागेसाठी ठाणे महापालिकेला केवळ दोन कोटी ८३ लाख भरायचे आहेत. परंतु, तीन वर्षांच्या कालावधीत अद्यापही जिल्हा प्रशासनाकडे ठाणे मनपाने ही रक्कम भरली नसल्याचे आमदार प्रताप सरनाईक यांनी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) सभागृहात उघड केली.
ठाणे पूर्वेच्या कोपरी परिसरात स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर वसतिगृहाची ही जागा आहे. सुमारे तीन हजार २०० मीटर असलेल्या या जागेची किंमत सुमारे २० कोटी रुपये असतानाही सवलतीच्या दरात केवळ दोन कोटी ८३ लाख रुपये महापालिकेला भरायचे असतानाही ते अद्यापही भरले नाहीत. यामुळे ठाण्यातील या जागेवर आदिवासी, गरीब विद्यार्थ्यांचे वसतिगृह बांधता न आल्याचे त्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनात आणून दिले आहे. यावर, मात्र ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही. त्यावर, लवकरच महापालिकेच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे सूतोवाच पालकमंत्र्यांनी केले. (प्रतिनिधी)