पाणी नसल्याने ‘जलपरी’ला लागला ब्रेक
By Admin | Updated: May 22, 2016 03:47 IST2016-05-22T03:47:40+5:302016-05-22T03:47:40+5:30
कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, त्यामुळे मिरजेतून लातूरला ‘जलपरी’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे

पाणी नसल्याने ‘जलपरी’ला लागला ब्रेक
मिरज (सांगली) : कृष्णा नदीपात्रात पाणी नसल्याने म्हैसाळ योजना गुरुवारपासून बंद पडली आहे, त्यामुळे मिरजेतून लातूरला ‘जलपरी’ रेल्वेने होणारा पाणीपुरवठा शनिवारपासून खंडित झाला आहे. मालगावसह अन्य गावांतील नळपाणी पुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे. वारणा धरणातून पाणी सोडण्यात येत असून, रविवारपर्यंत नदीपात्रात पुरेसा पाणीसाठा झाल्यास म्हैसाळ
योजनेचे पंप पुन्हा सुरू करण्यात
येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कर्नाटकात पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. कर्नाटकात पाणी पोहोचण्यासाठी कृष्णा नदीपात्रात ठिकठिकाणी असलेल्या बंधाऱ्यांचे दरवाजे उघडण्यात आल्याने गेला आठवडाभर नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाली
आहे.
म्हैसाळ योजनेचे पंप सुरू ठेवण्यासाठी आठ फूट पाणीसाठा आवश्यक असताना पाणीपातळी खालावल्याने गुरुवारपासून म्हैसाळ योजनेचे ६५ पंप बंद झाले आहेत.
म्हैसाळच्या पहिल्या टप्प्यातील पंपगृहाच्या १५ पंपांद्वारे पाणी उपसा करण्यात येत असल्याने म्हैसाळ बंधाऱ्यात आठ फूट पाणीसाठ्याची आवश्यकता आहे. म्हैसाळचे पंप बंद पडल्याने कालव्यातून जतपर्यंत जाणारे पाणी थांबले आहे.
मिरजेत कृष्णा घाटावर रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल उघडा पडल्याने रेल्वेसाठी होणारा पाणी उपसा बंद झाला आहे. रेल्वेचा पाणीपुरवठा सुरू राहावा, यासाठी नदीपात्रात पोकलॅनद्वारे जॅकवेलजवळील गाळ काढून पाणीसाठा करण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. नदीतून पाणी उपसा थांबल्याने शनिवारी लातूरला पाठविण्यासाठी पाणी टँकर भरले नाहीत. (प्रतिनिधी) वारणाचे पाणी आल्यानंतरच टँकर
शुक्रवारी रात्री रेल्वे टँकर भरले नसल्याने शनिवारी सकाळी टँकर भरण्यासाठी कशीबशी पाण्याची व्यवस्था करून ५० रेल्वे टँकर लातूरला रवाना करण्यात आले. मात्र त्यानंतर पाणीपुरवठा थांबविण्यात आला. वारणा धरणाचे पाणी उपलब्ध झाल्यानंतरच लातूरसाठी टँकर भरण्याचे काम सुरू होणार आहे. ११ एप्रिलपासून सुमारे ८ कोटी २०
लाख लीटर पाणी मिरजेतून लातूरला पाठविण्यात आले आहे.
समन्वयाचा अभाव - देशपांडे
पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आणखी १५ दिवस लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागणार आहे. नदीत पुरेसा पाणीसाठा राहावा, यासाठी प्रशासन व पाटबंधारे अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपाचे नेते मकरंद देशपांडे यांनी केला.