पुराव्याअभावी, कारवाई लटकली

By Admin | Updated: December 27, 2014 04:21 IST2014-12-27T04:21:47+5:302014-12-27T04:21:47+5:30

दहा हजारांच्या कर्जापोटी मेळघाटातील आदिवासी पित्याने स्वत:च्या मुलालाच मेंढपाळाकडे तारण ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीची

Due to lack of evidence, the action was hanging | पुराव्याअभावी, कारवाई लटकली

पुराव्याअभावी, कारवाई लटकली

नेर (जि़ यवतमाळ) : दहा हजारांच्या कर्जापोटी मेळघाटातील आदिवासी पित्याने स्वत:च्या मुलालाच मेंढपाळाकडे तारण ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीची प्रतीक्षा न करता स्वत: पुढाकार घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, पोलिसांनी कारवाई न करता उलट ‘पुरावाच नाही तर कारवाई कुणावर करणार’ असा सवाल उपस्थित केला आहे.
दाबका (ता.धारणी जि. अमरावती) गावातील आदिवासी शेतकऱ्याने नेर तालुक्यातील एका मेंढपाळाकडून दहा हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. याची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्याने आपल्या महादेव (१४) या मुलाला मेंढपाळाकडे तारण ठेवले. हा मेंढपाळ या मुलाकडून काम करुन घेत होता. त्या मोबदल्यात दरमहा अडीच हजार रुपये मजुरी ठरली होती.
‘लोकमत’ने या संबंधीचे वृत्त गुरूवारी प्रकाशित केल्यानंतर पोलीस वर्तुळात खळबळ निर्माण झाली. यवतमाळचे अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे यांनी सकाळीच नेरचे ठाणेदार गणेश भावसार यांच्याशी संपर्क करून प्रकरणाची अधिक माहिती घेतली.
दरम्यान, ठाणेदार भावसार यांना विचारले असता ते म्हणाले, आदिवासी मुलाला तारण ठेवल्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही किंवा तसा पुरावाही मिळाला नाही. त्यामुळे कारवाई कुणाविरुद्ध करावी, असा प्रश्न आहे. नेर पोलिसांनी महादेवला त्याच्या दाबका या गावी सोडले. त्याच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. मात्र त्यांची कोरकू भाषा पोलिसांना समजत नव्हती. मुलगा परत मिळाला याच्या पोचपावतीसाठी महादेवच्या शेजारी राहणाऱ्या एका डॉक्टरची मदत घेतली गेली. मात्र या प्रकरणात तारण अथवा सावकारीची भविष्यात तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल, असे भावसार यांनी सांगितले.
महादेवला धनज येथील ग्रामस्थांनी २३ डिसेंबर रोजी पोलीस पाटलाकडे नेले, तेथून त्याला नेर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथे महादेवने आपबिती सांगितली.

Web Title: Due to lack of evidence, the action was hanging

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.