डासांच्या अगरबत्तीमुळे श्वसनाचे विकार
By Admin | Updated: November 22, 2015 01:39 IST2015-11-22T01:39:18+5:302015-11-22T01:39:18+5:30
डासांना पळविण्यासाठी घराघरांमध्ये अगरबत्तीचा (कॉईल) सर्रास वापर केला जातो; परंतु त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. कारण डासांना

डासांच्या अगरबत्तीमुळे श्वसनाचे विकार
- संतोष हिरेमठ, औरंगाबाद
डासांना पळविण्यासाठी घराघरांमध्ये अगरबत्तीचा (कॉईल) सर्रास वापर केला जातो; परंतु त्याबाबत वैद्यकीय तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. कारण डासांना पळविणारी एक अगरबत्ती १०० सिगारेटइतकीच घातक असून ती फुप्फुसाच्या विकाराला आमंत्रण देणारी ठरू शकते.
अगरबत्ती लावल्यामुळे डास पळतात आणि डेंग्यू, मलेरियाचा धोका टळतो; परंतु त्याच वेळी अगरबत्तीचा अधिकाधिक वापर, त्याच्या सान्निध्यात राहणे हेदेखील धोक्याचे ठरत आहे. याच्या धुरामुळे श्वास घेण्यात अडथळा विशेषत: ‘क्रॉनिक आॅब्स्टक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) हा गंभीर आजार होऊ शकतो, असे श्वसनविकारतज्ज्ञांनी सांगितले. अमेरिका आणि युरोपच्या तुलनेत भारतात ‘सीओपीडी’मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण चार पटीने अधिक आहे. यामध्ये धूम्रपान न करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे श्वास घेण्यात येणारा अडथळा ही ‘सीओपीडी’ या गंभीर आजाराची सुरुवात असू शकते.
शरीरासाठी घातक
डासांना पळविणाऱ्या अगरबत्तीचा धूर शरीरासाठी घातक आहे. एक अगरबत्ती जाळल्यावर शंभर सिगारेट जाळण्याइतका धूर होतो. त्यामुळे सीओपीडी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे डासांना पळविण्यासाठी अन्य पर्यायांचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे.
- डॉ. सुहास बर्दापूरकर, श्वसनविकारतज्ज्ञ आणि माजी अध्यक्ष,
औरंगाबाद चेस्ट असोसिएशन
डासांपासून बचावाचे सोपे उपाय
सायंकाळी ६ ते ८ या वेळेत घराची दारे-खिडक्या बंद ठेवणे.
मच्छरदाणीचा वापर करणे.
घराचा परिसर स्वच्छ ठेवणे.
अगरबत्ती रात्रभर सुरू न ठेवणे तसेच धुराचे सान्निध्य टाळणे.