पाचवी मुलगी झाल्याने ‘नकुशी’ला सोडले
By Admin | Updated: May 22, 2016 04:08 IST2016-05-22T04:08:23+5:302016-05-22T04:08:23+5:30
दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाला. त्यानंतर चौथी मुलगी झाली आणि पाचवा मुलगाच होईल, अशी आशा होती; परंतु, मुलगी झाली. तिचा सांभाळ आपला भाऊ करील

पाचवी मुलगी झाल्याने ‘नकुशी’ला सोडले
कोल्हापूर : दोन मुलींनंतर तिसरा मुलगा झाला. त्यानंतर चौथी मुलगी झाली आणि पाचवा मुलगाच होईल, अशी आशा होती; परंतु, मुलगी झाली. तिचा सांभाळ आपला भाऊ करील, म्हणून तिला भावाच्या दारातच सोडून आल्याची कबुली ‘नकुशी’च्या आईने लक्ष्मीपुरी पोलिसांसमोर शनिवारी दुपारी दिली. हसीना रशीद सय्यद (वय ४०) व रशीद जब्बार सय्यद (४२, रा. शाहू कॉलेजनजीक, विचारेमाळ, कोल्हापूर) असे या नकुशीच्या आईवडिलांचे नाव आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वी गंगावेश परिसरात प्लास्टिकच्या पिशवीत दोन दिवसांची बालिका सापडली होती. याची फिर्याद सलीम शेख यांनी दिल्यानंतर तपासात पोलिसांना ‘नकुशी’च्या आईवडिलांची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी दुपारी हसीना आणि रशीद सय्यद या दोघांना पोलिस ठाण्यात आणले. त्यावेळी गुढ उकलले
‘‘मी बुधवारी (दि. १८) रात्री दीडच्या सुमारास विचारेमाळ येथील घरात प्रसूत झाले. त्यानंतर पतीला न सांगता मुलीला प्लास्टिकच्या पिशवीत कापडात लपेटून घेऊन गुरुवारी (दि. १९) पहाटे भाऊ सलीम शेख याच्या घरासमोर ठेवून निघून गेले’’, अशी माहिती हसीना यांनी पोलिसांना दिली.
कलम ३१७ प्रमाणहसीना व तिचा पती रशीद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हसीना सय्यद यांचे वडील व भाऊ लहान मुलांच्या खेळाच्या साहित्याची विक्री करतात. आई घरकाम करते. पती महाद्वार रोडवर बेल्ट विक्रीचा व्यवसाय करतात.
दोन दिवसांच्या या ‘नकुशी’ला संसर्ग झाल्याने तिला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे यांनी दिली.
माझ्या मुलीचा २ मे २०१६ रोजी विवाह झाला आहे. आपल्याला मुलगी झाल्याचे जावयाला समजेल, या भीतीपोटी मी पाचव्या मुलीला भावाच्या दारात ठेवून आले असल्याचे हसीना सय्यद यांनी सांगितले.
पाठोपाठ पोरी झाल्या म्हणून नवजात ‘नकुशी’ला भावाच्या दारात सोडून देणाऱ्या आईने सीपीआर रुग्णालयात ‘मला जरासं पोरीचं त्वॉँड तरी बघू द्या की हो...’ म्हणून केलेली आर्त विनवणी उपस्थितांच्या हृदयाला पीळ पाडून गेली. एका हरलेल्या ‘आई’चे डोळे बाळाच्या आठवणींनी व्याकुळ झाले होते....