दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद
By Admin | Updated: July 15, 2017 10:34 IST2017-07-15T09:11:40+5:302017-07-15T10:34:50+5:30
माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन केले आहे.

दरड कोसळण्याच्या भीतीमुळे माळशेज घाट 2 दिवस बंद
ऑनलाइन लोकमत
मुरबाड, दि. 15 - माळशेज घाटात कोणत्याही क्षणी दरड कोसळण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पोलिसांनी पर्यटकांना माळशेज घाटात न जाण्याचं आवाहन केले आहे. यामुळे पर्यटकांसाठी माळशेज घाट दोन दिवसांसाठी बंद राहणार आहे. शनिवारी व रविवारी घाटात सहलीसाठी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी दिली आहे.
सध्या परिसरात दरडींचा अंदाज घेणे सुरू आहे. दरम्यान वाहतुकीवर अद्याप बंदी घालण्यात आलेली नाही. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून माळशेज घाटात सतत दरडी कोसळण्याचा धोका जाणवत असल्यानं पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून काळजी घेण्यात येते
आणखी बातम्या वाचा
माळशेज घाट हे मुसळधार पावसाचे आगार मानले जाते. माळशेज घाट आणि परिसरात दरवर्षी पावसाळ्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो. मागील वर्षी २०१६ मध्ये जुलै महिन्यात माळशेज घाटात ४ ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या, करंजाळे गावच्या हद्दीत एक डोंगरकडा कोसळला होता, तर ऑगस्ट महिन्यात करंजाळे गावाजवळ नगर- कल्याण महामार्गावर डांबरी रस्ता खचला होता.
दरडी आणि डोंगरकडे कोसळण्याच्या घटनेत सुदैवाने मोठा अपघात किंवा मोठी दुर्घटना झाली नव्हती, मात्र या काळात घाटातून वाहतूक करण्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याने माळशेज मार्गे होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती.
सन २०१६ पासून राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने माळशेज घाटात घाटदुरुस्तीचे काम सुरू आहे. यापूर्वी घाटात अनेक ठिकाणी धोकादायक दरडींच्या ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी दरडी कोसळण्याची मोठी शक्यता आहे अशा ठिकाणी लोखंडी जाळ्या लावण्यात आल्या आहेत.