मेडिकल चालकाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
By Admin | Updated: July 2, 2017 22:39 IST2017-07-02T22:39:59+5:302017-07-02T22:39:59+5:30
गोराईला एका फार्म हाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या मेडिकल असोसिएशनच्या सदस्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला.

मेडिकल चालकाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू
ऑनलाइन लोकमत
मीरारोड, दि. 2- गोराईला एका फार्म हाऊसवर पिकनिकसाठी गेलेल्या मेडिकल असोसिएशनच्या सदस्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला. भार्इंदर पश्चिमेस स्थानिक ग्रामस्थ तथा नगरसेवक असलेल्या अॅड. सुहास रकवी यांचे गोराई एस्सेलवर्ल्ड मार्गावरील फार्म रिजन्सी रिसॉर्टच्या पुढे फार्महाऊस आहे. आज रविवार सुट्टीचा दिवस आणि पाऊस असल्याने भार्इंदरमधील औषधांच्या दुकान चालकांची संघटना असलेल्या भार्इंदर मेडिकल असोसिएशनचे सर्व सदस्य पिकनिकसाठी रकवी यांच्या फार्मवर गेले होते.
भार्इंदरच्या जेसल पार्क येथील अरिहंत मेडिकल दुकानाचा चालक कुणाल लुणिया (30) हा सायंकाळी तेथील स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्युमुखी पडला. गोराई पोलिसांनी बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडल्याचे सांगितले. मात्र माहिती देण्यास नकार दिला. वर्षभरापूर्वी कुणालचा मोठा भाऊ मणिपालचे आकस्मिक निधन झाले होते.
स्विमिंग पूलमध्ये असतानाच कुणाल याला ह्रदय विकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. परंतु गोराई पोलीस ठाणे आणि पोलीस निरीक्षक शिवाजी जमदाडे यांच्याशी संपर्क साधला असता मृत्यूचे नेमके कारण त्यांनी सांगितले नाही.