शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: August 17, 2016 21:32 IST2016-08-17T21:32:29+5:302016-08-17T21:32:29+5:30
पोहण्यासाठी गेलेल्या दोन १३ वर्षीय मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे.

शेततळ्यात बुडून दोघांचा मृत्यू
ऑनलाइन लोकमत
कळमनुरी, दि. 17 - पोहण्यासाठी गेलेल्या दोन १३ वर्षीय मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
कळमनुरी येथील नाईकवाडी मोहल्ला भागातील आश्रफ चौकात राहणारा मुस्तहिद रजा मुजीब पठाण व रज्जाक चौकात राहणारा शेख आदिल शेख हारुण हे दोघेही शहरापासून दोन किमी अंतरावर असलेल्या महादेव मंदिरा पाठीमागील एका मोठ्या शेततळ्यात ते पोहणे शिकण्यासाठी मित्रासोबत गेले होते. मुस्ताहिद हा गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. तर सहावीपासून शिक्षण सोडलेला आदिल वडिलांना हॉटेल कामात मदत करायचा.
पोहायला जाण्याबाबत त्यांनी घरी काहीच सांगितले नव्हते. मात्र सायंकाळी सहा वाजता शिकवणीला जाण्यासाठी मुस्तहिद घरी न आल्याने पिता मुजीब पठाण यांनी त्याची शोधाशोध केली. तेव्हा तो शेततळ्यावर पोहण्यासाठी गेल्याचे त्यांना कळाले. त्यानंतर ते शेततळ्याकडे गेले असता तेथे मुलांचे कपडे काठावर दिसले. त्यामुळे त्यांनी आरडा-ओरड करून नागरिकांना जमा केले. सात वाजेपर्यंत दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यात आढळून आले. अक्षय ढगे, विनोद खिल्लारे, मो. अन्वर, शे. महेबूब आदींनी त्यांचा शोध घेतला. यानंतर मृतांच्या घरी एकच गर्दी जमली होती.
या शेततळ्यावर दररोज मुले व मोठी माणसेही पोहायला जातात, असे सांगितले. तीस ते चाळीस लोक तेथे असतात. त्याप्रमाणेच ही मुले तेथे गेली होती. मात्र सायंकाळची वेळ असल्याने आज तेथे या मुलांशिवाय कुणीही नसावे, त्यामुळे हा अनर्थ घडल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शिवाय त्यांच्यासोबत अन्य एक मुलगा होता व तो भीतीपोटी पळून गेल्याचेही सांगितले जाते.