महापौर निवडीवरही वादाचे सावट
By Admin | Updated: November 10, 2014 04:20 IST2014-11-10T04:20:55+5:302014-11-10T04:20:55+5:30
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत या महिन्यात स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यानंतर महापौरपदाची निवडणूक होणार आहे
महापौर निवडीवरही वादाचे सावट
भिवंडी : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत या महिन्यात स्थायी समितीच्या अध्यक्ष पदाची निवड होणार आहे. त्यानंतर महापौरपदाची निवडणूक होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणूकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. नुकत्याच झालेला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार व राज्यस्थापनेत शिवसेनेचा सहभाग नसल्याचे पडसाद या निवडणुकीत उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदाची मुदत संपत असल्याने ही निवडणूक १० डिसेंबर २०१४ पूर्वी होणे आवश्यक आहे. मात्र याबाबतीत कोकण आयुक्तांकडून कोणतेही परिपत्रक आद्याप जाहीर झालेले नाही, अशी माहिती मनपा सचिव अॅड. के.एस. सोळंकी यांनी दिली. तत्पूर्वी स्थायी समिती सभापतिपदाची मुदत संपत आहे. त्यामुळे ही निवडणूक झाल्यानंतर महापौरपदाची निवडणूक होणार आहे. ही दोन्ही पदे आपल्या पदरात पडावीत म्हणून कोनार्क विकास आघाडी व भाजपा प्रयत्नशील आहे. त्यामुळे काही नगरसेवकांना पुन्हा एकदा लक्ष्मीदर्शनाची संधी चालून आली आहे.
नुकत्याच झालेल्या दिवाळीत कोनार्क विकास आघाडीचे विलास आर. पाटील यांनी लोणावळा-कार्ला बंगल्याचे नूतनीकरण करून तेथे नगरसेवकांची खास सोय केली होती. त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली. त्याचप्रमाणे महापालिकेत शिवसेना नगरसेवक काँग्रेसबरोबर विरोधी गटात आहेत. केंद्र व राज्यातील सत्तास्थापनेपासून शिवसेनेस मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे तणाव आहे. मात्र शिवसेनेस या वेळी दगाफटका होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)