निकालपत्रांमध्येही केला फेरफार

By Admin | Updated: June 10, 2016 04:50 IST2016-06-10T04:50:11+5:302016-06-10T04:50:11+5:30

अटकेत असलेला मास्टर मार्इंड मिथून मोरे याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रांमध्येही फेरफार केल्याची खळबळजनक घटना समोर आली

Due to changes in the results | निकालपत्रांमध्येही केला फेरफार

निकालपत्रांमध्येही केला फेरफार


मुंबई : मुंबई विद्यापीठ पेपर घोटाळा प्रकरणात अटकेत असलेला मास्टर मार्इंड मिथून मोरे याने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या निकाल पत्रांमध्येही फेरफार केल्याची खळबळजनक घटना समोर आली. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच ही बाब उघडकीस आली.
मुंबई विद्यापीठात इंजिनीयरिंगच्या पेपरचा महाघोटाळा भांडुुप पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवशंकर भोसले यांच्या पथकाने उघडकीस आणला. कोऱ्या उत्तरपत्रिका काढून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना घरी सोडविण्यासाठी देणाऱ्या या रॅकेटचा पोलखोल करत, भांडुप पोलिसांनी मिथुन मोरे, चिमण सोलंकी, संजय कुंभार, दिनकर म्हात्रे हे चौघे शिपाई, संदीप जाधव, रोहन मोरे हे कारकून आणि कस्टोडियन प्रभाकर वझे यांच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणाचा शोध सुरु असताना यातील मास्टरमार्इंड मोरे याने विद्यार्थ्यांच्या निकालपत्रांमध्येही फेरफार केल्याचे उघडकीस आले. नापास असतानाही उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका बनवून देण्याचा प्रताप मोरेने केला आहे. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी अटक केलेल्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याच्या चौकशीतून ही बाब उघड झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक विद्यार्थ्याला गणित विषयात १०० पैकी २८ गुण मिळाले होते. असे असतानाही त्यांनी उत्तीर्ण झाल्याची बनावट मार्कशिट तयार करुन पदवीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयात सादर केली.
संबंधित विद्यालयाने हे निकालपत्र विद्यापिठात तपासणीसाठी पाठवताच याचे बिंग फुटले. यामागे मोरेचा हात असल्याचे तपासात समोर येत आहे. याप्रकरणी विद्यापीठातील वरीष्ठांचाही हात असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
>अधिक तपास सुरु
कामोठे पोलिसांसह भांडुप पोलिसांनी मोरेकडे कसून चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी विद्यापीठातील वरीष्ठांचाही हात असल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार अधिक तपास सुरु असल्याची माहिती भांडुप पोलिसांनी दिली.

Web Title: Due to changes in the results

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.