३० हजारांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यास अटक

By Admin | Updated: August 29, 2014 00:56 IST2014-08-29T00:56:45+5:302014-08-29T00:56:45+5:30

जमीन विक्रीच्या परवानगीसाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा येथील

Due to a bribe of 30 thousand rupees, the deputy collector was arrested | ३० हजारांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यास अटक

३० हजारांची लाच घेताना उपजिल्हाधिकाऱ्यास अटक

वर्धा एसीबीची यवतमाळात कारवाई
यवतमाळ : जमीन विक्रीच्या परवानगीसाठी ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील पुनर्वसन विभागाचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश भट यांना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा येथील पथकाने ही कारवाई केली.
ज्ञानेश भट यांच्याकडे विशेष भूसंपादन उपजिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त प्रभार आहे. काही दिवस त्यांच्याकडे अपर जिल्हाधिकारी पदाचीही अतिरिक्त जबाबदारी होती. याच काळात लाचेचे हे प्रकरण शिजले. वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील शेतकऱ्याची बाभूळगाव तालुक्याच्या (जि. यवतमाळ) नांदेसावंगी येथे वडिलोपार्जित जमीन आहे. प्रकल्पात गेलेल्या या शेतीतील काही भाग लाभक्षेत्रासाठी सोडावा (लेवी) लागतो. सदर सोडलेल्या जमिनीच्या विक्रीसाठी पुनर्वसन विभाग व अपर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी लागते. ज्ञानेश शंकर भट हे यवतमाळ येथे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रभारात असताना परवानगीचे हे प्रकरण त्यांच्या पुढे आले. त्यांनी ४० हजार रुपयांची मागणी केली. त्यांना १० हजार रुपये दिलेही गेले. हेच प्रकरण पुनर्वसन विभागात मंजुरीसाठी आले असता, भट यांनी राहिलेल्या ३० हजाराचे स्मरण सदर शेतकऱ्याला करून दिले.
शेतकऱ्याने प्रकरणाची तक्रार वर्धा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्याकडे केली. त्यानुसार लोखंडे व पोलीस निरीक्षक प्रदीप चौघळकर यांच्या पथकाने सापळा रचला.
गुरुवारी सायंकाळी ५.१५ वाजता उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) ज्ञानेश भट यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांच्याच कक्षात अटक करण्यात आली.
या कारवाईत वर्धा एसीबीचे प्रदीप देशमुख, संजय खल्लारकर, नरेंद्र पाराशर, मनीष बोडे, पांडे, कदम यांनी सहभाग घेतला. (स्थानिक प्रतिनिधी)
सहायक फौजदारही जाळ्यात
यवतमाळ शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक दुर्गाप्रसाद दत्तप्रसाद शुक्ला (५६) यांना एका महिलेकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना गुरुवारी दुपारी ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच अटक करण्यात आली. गेल्या महिनाभरातील शहर ठाण्यातील ही तिसरी कारवाई आहे. या ट्रॅपच्या वेळी यवतमाळ एसीबीचे पथक आॅटोरिक्षामध्ये दबा धरून बसले होते. एका युवकाविरुद्ध अदखलपात्र गुन्ह्याची तक्रार यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणात बी फायनल पाठविणे, आयपीसी न लावता प्रतिबंधात्मक कारवाईवर प्रकरण मिटविणे आणि तक्रार करणाऱ्या फिर्यादीविरुद्धच कारवाई करणे या ‘कामगिरी’साठी सदर युवकाच्या बहिणीला दोन हजाराची लाच मागण्यात आली होती. यवतमाळ एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख, निरीक्षक नंदकुमार जामकर यांच्या पथकाने हा ट्रॅप यशस्वी केला.

Web Title: Due to a bribe of 30 thousand rupees, the deputy collector was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.