महावितरणच्या सदोष बिलांमुळे ग्राहकांना भुर्दंड आणि मन:स्ताप

By Admin | Updated: June 10, 2016 03:26 IST2016-06-10T03:26:28+5:302016-06-10T03:26:28+5:30

येथील महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वीजबिलांमध्ये सध्या प्रचंड गोंधळ झाला आहे.

Due to bad debts of MSEDC | महावितरणच्या सदोष बिलांमुळे ग्राहकांना भुर्दंड आणि मन:स्ताप

महावितरणच्या सदोष बिलांमुळे ग्राहकांना भुर्दंड आणि मन:स्ताप

सुनील घरत,

वसई/पारोळ- येथील महावितरणकडून दिल्या जाणाऱ्या वीजबिलांमध्ये सध्या प्रचंड गोंधळ झाला आहे. बिले अव्वाच्या सव्वा देणे, त्यावर मीटरचा फोटो नसणे असला तरी त्यावर तो कधी घेतला त्या तारखेचा उल्लेख नसणे हे प्रकार नेहमीचेच झाले असून, त्याविरुद्ध कोणत्याही क्षणी जनप्रक्षोभ होण्याची शक्यता आहे. वीज बिलविषयक कायद्याची माहिती जनतेला पुरेशी नाही याचा गैरफायदा महावितरण घेते आहे.
सध्या सुरु असलेल्या वाढीव बिलाच्या संदर्भात सुद्धा या नियमावलीचे उल्लंघन हाच मुद्दा आहे. मुळात वीज देयक हे ३० दिवसांचे असते आणि वीज बिलावर तशी नोंद असते. परंतु प्रत्यक्षात काही वेळा मीटर रीडिंग हे ३५ ते ४० दिवसांनी घेतले जाते तर पुढील महिन्यात २० ते २५ दिवसात, त्यामुळे ग्राहकांच्या वीज देयकात मोठी तफावत येत असते. साधारणत: उन्हाळ्यामुळे वीज वापर वाढलेला असतो त्यात ३८ ते ४० दिवसांनी रीडिंग घेऊन ते ३० दिवसाच्या स्लॅब मध्ये बसवल्यामुळे वरच्या स्लॅबचे दर आकारले जातात, या दोन्हीचा परिणाम म्हणून वीज बिलामध्ये ५० ते ७० टक्के वाढ झाली आहे. या आधी बिलावर फोटो रीडिंग मध्ये फोटो घेतल्याची तारीख येत होती आणि त्यामुळे ग्राहकांना दोन देयक मधील रीडिंग चे दिवस मोजता येत होते. परिणामी काही ग्राहक अधिकाऱ्याना जाब विचारत होते, म्हणून जून २०१४ पासून वीज देयकावर रीडिंग फोटो वरची तारीख देणे बंद करण्यात आले जेणेकरून ग्राहकांना दोन देयकामधील रीडिंग चा फरक कळू नये. या विषयी मा. उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार वसईत भाजपचे पदाधिकारी व महावितरणचे मुख्य अभियंता तसेच इतर अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये हा मुद्दा प्रामुख्याने चर्चिला गेला होता व वीज मीटरमध्ये नियमितता व वीज देयकात पारदर्शकता आणण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते, त्यानंतर सुद्धा सातत्याने पाठपुरावा करून आणि आश्वासन देऊन सुद्धा अधिकारी यामध्ये सुधारणा करण्यास तसेच फोटोमध्ये तारीख टाकण्यास टाळाटाळ करीत आहेत.
नियमानुसार जर मीटर रीडिंग घेण्यास उशीर झाला तर ३० दिवसा प्रमाणे त्याचे मोजमाप होऊन ग्राहकांना स्लॅबचा फायदा द्यायला हवा, परंतु ठेका पद्धतीने होणाऱ्या मीटर रीडिंग आणि बिल वाटण्याच्या पद्धतीमध्ये सुधारण्या करण्याऐवजी ठेकेदाराला पाठीशी घालून ग्राहकांना लाखो रुपयाचा भुर्दंड सोसायला महावितरण भाग पाडते आहे.
ठेकेदारांना पाठीशी घालणे व कामचुकारपणामुळे महावितरणच्या या ग्राहकांना प्रचंड आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये त्वरीत सुधारणा करावी अन्यथा मोठया लोक क्षोभाला सामोरे जावे लागेल.
>काय आहेत मागण्या ?
मीटर रीडिंग ३० दिवसांनीच व्हावे, देयकावरील मीटर रीडिंगच्या फोटोवर तो घेतल्याचा दिनांक यावा, वीज देयक तयार झाल्यापासून ३ दिवसामध्ये ग्राहकांना मिळावे. आता ज्यांना वाढीव देयक गेले आहे त्या सर्वांची देयके दुरुस्त करून परत पाठवावीत. अशी मागणी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष व वसई तालुका वीजवितरण समितीचे सदस्य मनोज पाटील यांनी महावितरणकडे केली आहे.

Web Title: Due to bad debts of MSEDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.