'अजिंक्यतारा'मुळे ता-यांची फरफट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2015 09:12 IST2015-08-20T00:52:12+5:302015-08-20T09:12:06+5:30
मॉरिशस येथे मराठी चित्रपटांच्या गौरवार्थ २१ ते २३ आॅगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळा अचानक रद्द करण्यात आला आहे.

'अजिंक्यतारा'मुळे ता-यांची फरफट
मॉरिशसमधील अजिंक्यतारा पुरस्कार सोहळा रद्द
मुंबई : मॉरिशस येथे मराठी चित्रपटांच्या गौरवार्थ २१ ते २३ आॅगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेला ‘अजिंक्यतारा’ पुरस्कार सोहळा अचानक रद्द करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विमानतळावर पोहोचलेले सुमारे ३0 कलावंत आणि अन्य संबंधित मंडळी मिळून तब्बल ८० जणांना विमानतळावरूनच माघारी परतावे लागल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी पहाटे विमानतळावर पोहोचल्यावरच या सर्वांना हा सोहळा अचानक रद्द झाल्याची बातमी समजली आणि त्यांना धक्काच बसला.
‘अजिंक्यतारा’चा पहिलावहिला पुरस्कार सोहळा होता आणि तो धुमधडाक्यात साजरा करण्याचे आयोजकांनी ठरवले होते. ज्यांना पुरस्कार देणार होते, त्यांची नामांकनेही जाहीर झाली होती आणि त्यातून अंतिम विजेत्यांची घोषणा मॉरिशसमध्ये करण्यात येणार होती. पुरस्कार वितरणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. मात्र आता या सगळ्यावर पाणी पडले आहे. हा सोहळा पूर्णत: रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.
बुधवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास कलाकारांसह जवळपास ८० जण मॉरिशसला रवाना होणार होते. त्यासाठी हे सर्वजण विमानतळावर वेळेत दाखल झाले. मात्र पहाटे चारच्या सुमारास पुरस्कार सोहळा रद्द करण्यात आल्याचा निरोप हाती पडताच त्यांना धक्काच बसला. सोहळा रद्द करण्याचे कारण न समजल्याने संभ्रम अधिकच वाढला. परिणामी, या कलाकारांना मॉरिशसऐवजी आपापल्या घरी परतावे लागले. यामध्ये अभिजित केळकर, मानसी नाईक, सई ताम्हणकर, पुष्कर श्रोत्री, नेहा पेंडसे, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, संस्कृती बालगुडे, पूजा सावंत तसेच काही बालकलाकार आणि त्यांचे पालक असल्याचे समजते.
हा सोहळा अचानक रद्द होण्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. तरी या पुरस्कार सोहळ्याच्या एका आयोजक कंपनीनेच त्यातून माघार घेतल्याने अशी वेळ ओढवल्याचे समजते. तथापि, या सोहळ्याचे आयोजक सुपरविस्टा एन्टरटेन्मेंटने हा पुरस्कार सोहळा रद्द केल्याला दुजोरा देतानाच हा सोहळा काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.