व्यसनाधीनता पालकांमुळेच
By Admin | Updated: May 30, 2015 01:08 IST2015-05-30T01:08:57+5:302015-05-30T01:08:57+5:30
नोकरीच्या निमित्ताने पालक सतत घराबाहेर असतात. घरी आल्यानंतरही मुलांचा हक्काचा वेळ टीव्हीला दिला जात असल्यामुळे मुलांमध्ये कमालीची अस्वस्थता असते,

व्यसनाधीनता पालकांमुळेच
पुणे : नोकरीच्या निमित्ताने पालक सतत घराबाहेर असतात. घरी आल्यानंतरही मुलांचा हक्काचा वेळ टीव्हीला दिला जात असल्यामुळे मुलांमध्ये कमालीची अस्वस्थता असते, त्यातून मार्ग काढण्यासाठी मुले व्यसनांचा पर्याय अवलंबतात. मुलांच्या व्यसनाधीनतेला पालकच सर्वाधिक जवाबदार असल्याचे स्पष्ट मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले.
जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त ज्ञानेश्वरी प्रतिष्ठानच्या वतीने तंबाखूमुक्त जनजागृती अभियानाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. पांडुरंग बलकवडे, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. अमोल कोल्हे, शहराध्यक्ष विनायक निम्हण, अभिनेत्री जुई गडकरी, अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा डॉ. सायली कुलकर्णी उपस्थित होते.
तेंडुलकर म्हणाले, ‘‘सध्या समाजात पालक आणि मुलांमध्ये संवादाचा अभाव जाणवत आहे. नोकरीवरून घरी आल्यानंतरही पालक टीव्हीमध्ये गुंतून राहतात. त्यामुळे त्यांचे मुलांशी असलेले नाते तुटत चालले आहे. खरेतर तोच वेळ मुलांना दिला तर मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आई-वडिल हे मुलांचे हक्क असतात. पालकांनी नुसता पैशाचा विचार करून चालणार नाही, तर पैशाइतकेच मुलांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आज मुलांप्रमाणेच मुलीही व्यसनाधीनतेच्या आहारी चालल्या आहेत.’’ (प्रतिनिधी)
चारचौघात वेगळे दिसण्यासाठी व्यक्तिमत्त्व नव्हे तर कर्तृत्व महत्त्वाचे असते. व्यसन करणे म्हणजे पुरुषार्थ नव्हे, तर व्यसनाशिवाय आयुष्यात आलेल्या संकटांना सामोरे जाणे हा खरा पुरुषार्थ आहे. सशक्त देश घडवण्यासाठी तरुणांची गरज आहे. त्यासाठी तरुणांनी व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे.
- डॉ. अमोल कोल्हे
कार्यक्षम तरुणांच्या खांद्यावरच उद्याच्या देशाची धुरा आहे. व्यसनांच्या आहारी जाऊन कुटुंब आणि आयुष्य बरबाद करणाऱ्या तरुणांचा देशाला उपयोग नसल्याचे नमूद केले.
- डॉ. सदानंद मोरे