DTH, angry response after a month after cable subscribers | डीटीएच, केबल ग्राहकांमध्ये महिन्यानंतर नाराजीची प्रतिक्रिया
डीटीएच, केबल ग्राहकांमध्ये महिन्यानंतर नाराजीची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : डीटीएच आणि केबल टी.व्ही.साठी ट्रायचे नवे नियम लागू होऊन आता सुमारे एक महिना झाला आहे. पहिल्या महिन्यात बहुतांश ग्राहकांची नकारात्मक प्रतिक्रिया आली आहे. नव्या नियमांबाबत ग्राहक आजही गोंधलेल्या अवस्थेत आहेत, तरीही ट्रायचे चेअरमन आर. एस. शर्मा यांनी मात्र नव्या नियमांचे जोरदार समर्थन केले आहे.


आर. एस. शर्मा यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, ग्राहक हा राजा आहे. तथापि, राजाला राज्य करण्याची परवानगी दिली, तर तो चांगले आयुष्य जगू शकतो. एखादा व्यक्ती जेव्हा हॉटेलात जेवायला जातो, तेव्हा त्याला थाळीतील संपूर्ण सात पदार्थांऐवजी दोनच पदार्थ हवे असतील, तर ते त्याला मिळायला हवे. त्यासाठी त्याला दोनच पदार्थांचे बिल आकारायला हवे. संपूर्ण थाळीचे बिल त्याच्या माथी मारले जाता कामा नये, तसेच टी.व्ही.वर संपूर्ण पॅकेजचे पैसे आकारण्याऐवजी ग्राहकाला हव्या असलेल्या वाहिन्यांचेच पैसे आकारले जायला हवे.


आर. एस. शर्मा म्हणाले की, तुम्ही जेव्हा फूड डिलिव्हरी सेवेमार्फत एखाद्या रेस्टॉरंटमधून खाद्यपदार्थ मागवता, तेव्हा सेवादाते छोटेसे डिलिव्हरी शुल्क आकारतात. याच धर्तीवर ट्रायने डीटीएच व केबल सेवादात्यांना १०० वाहिन्यांच्या समुच्चयासाठी एनसीएफ (१३० रुपये अधिक १८ टक्के जीएसटी) आकारण्याची परवानगी दिली आहे. यात कोणत्या वाहिन्या निवडायच्या हे ठरविण्याचा अधिकार मात्र ग्राहकांना देण्यात आला आहे.


नियमांची पायमल्ली केल्याच्या तक्रारी
ट्रायची भूमिका तत्त्वत: योग्य दिसत असली, तरी लोकांकडून मात्र नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. टिष्ट्वटरवर आलेल्या प्रतिक्रियांत ग्राहक म्हणतात की, नव्या व्यवस्थेने गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. किंमत व्यवस्थेबाबत ग्राहक गोंधळलेले आहेत, शिवाय हॅथवे आणि अन्य मोठ्या कंपन्यांकडून नियमांची पायमल्ली केली जात आहे. एका ग्राहकाने लिहिले की, हॅथवेकडून ग्राहकांना १०० वाहिन्या निवडण्याचे स्वातंत्र्यच दिले जात नाही.


Web Title: DTH, angry response after a month after cable subscribers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.