साडेनऊ लाखांची एक्स रे यंत्रे धुळीत

By Admin | Updated: November 3, 2014 03:51 IST2014-11-03T03:51:29+5:302014-11-03T03:51:29+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयात खासगीकरणाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षापासून चालू अवस्थेतील दोन एक्स रे यंत्रे अडगळीत ठेवण्यात आली असून प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे अनेक रुग्णांना वणवण करावी लागत आहे.

Dry X-ray X-ray devices | साडेनऊ लाखांची एक्स रे यंत्रे धुळीत

साडेनऊ लाखांची एक्स रे यंत्रे धुळीत

जितेंद्र कालेकर, ठाणे
विठ्ठल सायन्ना जिल्हा शासकीय रुग्णालयात खासगीकरणाच्या नावाखाली गेल्या दीड वर्षापासून चालू अवस्थेतील दोन एक्स रे यंत्रे अडगळीत ठेवण्यात आली असून प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे अनेक रुग्णांना वणवण करावी लागत आहे. चांगली यंत्रे अक्षरश: भंगारात पडल्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा शासकीय रुग्णालयात ५०० एमए (क्षमता) आणि ३०० एमए (क्षमता) अशा दोन यंत्रांद्वारे एक्स रे काढले जात होते. सात लाखांच्या खर्चातून ५०० एमएची यंत्रे खरेदी करण्यात आली होती. ती केवळ सहा महिनेच वापरली आहेत. दुसरी ३०० एमएची यंत्रे २० वर्षे जुनी असून ती दीड लाख रुपयांना खरेदी करण्यात आली होती. विशेष म्हणजे जुनी असली तरी तीदेखील चांगल्या अवस्थेत आहेत. आता या दोन मशिन्स अडगळीत ठेवण्यात आल्या असून, त्याऐवजी केवळ एका १०० एमएची छोटी यंत्रे एक्स रे काढण्यात येत आहेत. या छोट्या यंत्रांची क्षमताही कमी आहे. शिवाय अनेक प्रकारचे एक्स रे वरील दोन्ही यंत्रांअभावी काढलेच जात नाहीत.
आधी कार्यरत असलेल्या दोन्ही एक्स रे यंत्रांमुळे पाठीच्या मणक्याचे व केयूबी (किडनी युरिनरी ब्लॅडर एक्स रे) केले जायचे. यातून मूत्रपिंडातील मूतखड्याची तपासणी करण्यात येत असे. याशिवाय किडनीचे काम व्यवस्थीत सुरू आहे का हे तपासण्यासाठी आयव्हीपी एक्स रे तसेच स्टोनची स्थितीही तपासली जात होती. आता ५०० आणि ३०० एमएची यंत्रे बाजूला काढल्यामुळे वरीलपैकी कोणत्याही तपासण्या जिल्हा रुग्णालयात केल्या जात नाहीत. ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील ९० ते १०० रुग्ण मोठे एक्स रे काढण्यासाठी येत होते.
आता ते काढलेच जात नसल्यामुळे अपघातात फ्रॅक्चर झालेले कंबर, पाठदुखी तसेच किडनीचे रुग्ण आधीच व्याधीने बेजार झालेले असताना त्यांना या तपासण्यांसाठी ग्रामीण भागातून जिल्हा रुग्णालय आणि तिथून पुन्हा मुंबई किंवा इतरत्र जाण्यासाठी द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे. यात ज्येष्ठ नागरिकांचीही चांगलीच दमछाक होते. या सर्व रुग्णांना एकतर कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुगणालयात किंवा मुंबई महापालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयांमध्ये पाठविले जाते. तिथे त्यांना महागड्या दरामध्ये एक्स रे काढावे लागतात.

Web Title: Dry X-ray X-ray devices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.