दारूच्या नशेत कार चालवत बसथांब्याला धडक

By Admin | Updated: August 1, 2016 04:43 IST2016-08-01T04:43:08+5:302016-08-01T04:43:08+5:30

कारने दिलेल्या जोरदार धडकेत बसथांब्यावर उभ्या असलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला.

A drunken driving car hit the bus | दारूच्या नशेत कार चालवत बसथांब्याला धडक

दारूच्या नशेत कार चालवत बसथांब्याला धडक


मुंबई : कारने दिलेल्या जोरदार धडकेत बसथांब्यावर उभ्या असलेल्या एका इसमाचा मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी उशिरा रात्री घडली असून, कारमधील तिघे हे दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
संतोष तिवारी (३४) असे या अपघातात मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. जे व्यवसायाने बाऊन्सर होते. मालाड पूर्वच्या पुष्पापार्क या २८१ क्रमांकाच्या बसथांब्यावर ही घटना घडली.
दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश जाधव, संदीप बेलीयर आणि राज रघुवंशी हे तिघे तिशीतील तरुण होंडासिटी कारने अंधेरी परिसरातून दारूच्या नशेत कांदिवलीच्या दिशेने निघाले होते. रात्री पावणे तीनच्या सुमारास ते मालाड पश्चिम द्रुतगती महामार्गावर असलेल्या पुष्पापार्क बसथांब्याजवळ पोहोचले. मात्र नशेत असल्याने त्यांचा कारवरील ताबा सुटला आणि या कारची जोरदार धडक पुष्पापार्क या बसथांब्याला लागली. त्या वेळी तिवारी तिथे बसची प्रतीक्षा करीत उभे होते.
कारने दिलेल्या धडकेत तिवारी याना गंभीर दुखापत होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
जखमी झालेले हे तिघे दारूच्या नशेत असल्याचे त्यांच्या तपासणीमध्ये उघड झाले आहे. मात्र कार कोण चालवत होते हे अद्याप समजू शकलेले नाही. कारण या तिघांपैकी एकालाही अद्याप शुद्ध आलेली नाही. या अपघातात बसथांब्यावर बसची वाट पाहत असलेली अजून एक व्यक्ती जखमी झाली आहे, ज्याचे नाव सिंघ असल्याचे समजते. त्यानुसार पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Web Title: A drunken driving car hit the bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.