औषध खरेदीची होणार चौकशी
By Admin | Updated: April 8, 2016 03:28 IST2016-04-08T03:28:06+5:302016-04-08T03:28:06+5:30
आरोग्य विभागांतर्गत करण्यात आलेल्या औषधांच्या खरेदीची पारदर्शकपणे चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे आयुक्त श्रीमती आय. कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल

औषध खरेदीची होणार चौकशी
मुंबई : आरोग्य विभागांतर्गत करण्यात आलेल्या औषधांच्या खरेदीची पारदर्शकपणे चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे आयुक्त श्रीमती आय. कुंदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी विधान परिषदेत केली.
आरोग्य विभागातील बेबंद खरेदीबाबत ‘लोकमत’ने बुधवार व गुरुवारी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत राष्ट्रवादीचे अमरसिंह पंडित, सतीश चव्हाण, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे यांनी या विषयावर गुरुवारी अल्पकालीन चर्चा उपस्थित केली होती. त्यावर बोलताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. २०१३ साली हृदयरोग्यांसाठी लागणारे स्टेस्टोकॉयमा पॅरासिटीमॉलच्या औषधांचा बदललेला रंग तसेच भंडारा जिल्ह्यातील औषधखरेदीची चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा शल्यचिकित्सक रत्नागिरी यांनी ऐन्टीडी नावाच्या इंजेक्शनच्या ४८०० व्हॉयल मागवल्या. प्रत्यक्षात ३१०६ इंजेक्शन्स पडून राहिले आणि एक्सपायरी डेट उलटून गेल्याने वाया गेले. हाच प्रकार यवतमाळ (११७३), वर्धा (३८२) येथे घडला व हजारो इंजेक्शन्स वाया गेली. याकडे सदस्यांनी मंत्र्यांने लक्ष वेधले. त्यावर मंत्री सावंत म्हणाले, जिल्हावार औषध खरेदीची मागणी घेवून प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली ४० सदस्यांची समिती खरेदीचा निर्णय घेते. औषध खरेदीच्या पारदर्शक चौकशीसाठी एनएचआरएम आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
(विशेष प्रतिनिधी)
> ३०० डॉक्टरांचा सुगावा नाही!
आरोग्य विभागात कार्यरत असणाऱ्या ४८५ डॉक्टरांपैकी कायम रजेवर असणाऱ्या १५५ डॉक्टरांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तर, उर्वरित ३०० डॉक्टरांचा अद्याप कोणताच सुगावा लागला नसल्याची धक्कादायक माहितीही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली. येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यातील राजीव गांधी जीवनदायी योजनेतील निकषात बदल करण्यात येतील. पांढरे रेशन कार्डधारक आणि पत्रकारांचा यात समावेश करण्यात येणार आहे. तसेच या योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढविण्याबरोबर उपचाराचीही मर्यादा वाढविण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.