नशेच्या आहारी जाऊन घरातच साठवला कचरा!
By Admin | Updated: May 21, 2016 02:12 IST2016-05-21T02:12:25+5:302016-05-21T02:12:25+5:30
कचऱ्याने भरलेले घर आणि त्याच्या सहन न होणाऱ्या दुर्गंधीने मुलुंडमधील झवेर मार्गावरील लक्ष्मीसदन वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

नशेच्या आहारी जाऊन घरातच साठवला कचरा!
चेतन कंठे,
मुंबई- जिवंत कोंबड्या, मांजरी, प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, उरलेले अन्न... अशा विविध प्रकारच्या कचऱ्याने भरलेले घर आणि त्याच्या सहन न होणाऱ्या दुर्गंधीने मुलुंडमधील झवेर मार्गावरील लक्ष्मीसदन वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीने हा प्रताप केला असून याविषयी स्थानिकांमध्ये संतापाची भावना आहे.
मुलुंडमध्ये गुरुवारी एका वृद्ध महिलेच्या घरात आठ ट्रक कचरा सापडल्याने खळबळ माजली होती. त्यातच शुक्रवारी मुलुंड पश्चिम येथील लक्ष्मीसदन वसाहतीतील उदय जोशी (४०) यांनी राहत्या घराची कचराकुंडीच केल्याचे निदर्शनास आले. जोशी यांनी हा कचरा घरात साठवून ठेवल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले.
घरात साठविलेल्या कचऱ्यामुळे वसाहतीतील रहिवासी त्रस्त झाले आहेत. या प्रकारामुळे आरोग्यास धोका संभवत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे रोगराईच्या भीतीने वसाहतीतील लहान मुलांना आवारात खेळण्यास पाठवू शकत नसल्याचे रहिवासी सुनील गुप्ते यांनी सांगितले. ‘लक्ष्मीसदन’ वसाहत तीन मजल्यांची असून येथे ४० कुटुंबे वास्तव्यास आहेत.
जोशी यांच्या या अजब वर्तवणुकीविषयी वसाहतीतील रहिवाशांनी मिळून वसाहतीच्या समितीकडे तक्रार केल्याचे सुनील गुप्ते यांनी सांगितले. शिवाय, मुलुंडमधील चुनीलाल सावला यांच्या घरातील कचऱ्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता याविषयी पालिकेकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.