समुद्रात बुडून विदेशी पर्यटकाचा मृत्यू::रशियन पर्यटक
By Admin | Updated: January 3, 2015 00:16 IST2015-01-02T23:40:39+5:302015-01-03T00:16:14+5:30
ब्लादिनीर लिओनोव्ह (वय २४) या विदेशी पर्यटकाला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने

समुद्रात बुडून विदेशी पर्यटकाचा मृत्यू::रशियन पर्यटक
शिरोडा : शिरोडा वेळागर येथील समुद्रात गेलेल्या ब्लादिनीर लिओनोव्ह (वय २४) या विदेशी पर्यटकाला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
नववर्षाच्या स्वागतासाठी गोवा व सिंधुदुर्ग परिसरात अनेक देशी-विदेशी पर्यटक दाखल झाले आहेत. गुरुवारी रेडी हुडावाडी येथे विदेशी पर्यटकाची दुचाकी घसरुन गंभीर जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच आज सायंकाळी शिरोडा वेळागर येथील समुद्रकिनारी मौजमजा करणाऱ्या रशियन पर्यटकाला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला. रशियन पर्यटक ब्लादिनीर लिओनोव्ह व त्याची मैत्रिण कॅटरिना (२४) हे गोवा येथून सिंधुदुर्ग पर्यटनासाठी आले होते. ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिरोडा वेळागर समुद्रात मौजमजा करण्यासाठी आले. याच दरम्यान ओहोेटीचा वेळ असल्याने ब्लादिनीर याला पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज आला नाही. यामुळे तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर गटांगळ्या खात वाहून जाऊ लागला. त्याची मैत्रिण कॅटरिना हिच्या ही बाब लक्षात येताच तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तेथील हॉटेल व्यावसायिक अजय अमरे व मदन अमरे यांनी ब्लादिनीरला पाण्याबाहेर काढले. त्याला तत्काळ शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ब्लादिनीरचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या घटनेचा पंचनामा सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होता.(प्रतिनिधी)