२०१९पर्यंत दुष्काळमुक्ती
By Admin | Updated: November 21, 2015 02:20 IST2015-11-21T02:20:14+5:302015-11-21T02:20:14+5:30
जलयुक्त शिवार योजनेमधून आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. त्यासाठी १४०० कोटी खर्च करून सहा लाख हेक्टर शेतीला पाणी पुरेल, अशी व्यवस्था केली आहे.

२०१९पर्यंत दुष्काळमुक्ती
पाटण (जि. सातारा) : जलयुक्त शिवार योजनेमधून आतापर्यंत २४ टीएमसी पाणी अडविले आहे. त्यासाठी १४०० कोटी खर्च करून सहा लाख हेक्टर शेतीला पाणी पुरेल, अशी व्यवस्था केली आहे. २०१९पर्यंत संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली.
मरळी, दौलतनगर येथे आमदार शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. या वेळी मंत्री दिवाकर रावते, गिरीश महाजन, डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री विजय शिवतारे, राज्यमंत्री दादा भुसे, आमदार सत्यजीत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आघाडी शासनाने १५ वर्षांत पश्चिम महाराष्ट्राला १३ हजार कोटी दिले आहेत. आम्ही एका वर्षात आठ हजार कोटी दिले. उसाचा प्रश्न चिघळला असून, शेतकऱ्यांना एफआरपी मिळाली पाहिजे यासाठी कारखान्यांना २००० कोटी रुपये दिले आहेत. कारखान्यांना मदत केली पाहिजे, तरच एफआरपीचा प्रश्न सुटेल, असे सांगून ते म्हणाले, सिंचनामध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवू. (प्रतिनिधी)
जिथे पवार; तिथे घोटाळा! : राज्यात इतके घोटाळे करून ठेवले आहेत की, ‘जिथे पवार; तिथे घोटाळा’ झाला आहे. मातीचा बंधारा बांधतो म्हणायचे आणि तिथे काँक्रीट धरणे बांधली. पाणी मात्र उपलब्ध नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
शंभूराजना लवकरच लाल दिवा : शंभूराज देसाई यांना लाल दिव्याची गाडी देण्याबाबत मंत्री दिवाकर रावतेंसमवेत आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.