दुष्काळ कायमचा संपवा!
By Admin | Updated: December 11, 2014 00:46 IST2014-12-11T00:46:55+5:302014-12-11T00:46:55+5:30
मोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास

दुष्काळ कायमचा संपवा!
विधिमंडळ अधिवेशन: दोन दिवसाच्या गोंधळानंतर चर्चेला सुरुवात
अतुल कुलकर्णी - नागपूर
मोर्चे, घोषणाबाजी करून विधानसभेचे दोन दिवस वाया गेल्यानंतर बुधवारी अखेर दुष्काळावरील चर्चेवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. सगळे कामकाज बाजूला सारुन चर्चा सुरू झाली आणि २८८ पैकी जवळपास ६० ते ६५ सदस्यांनी दिवसभराच्या भाषणात दुष्काळाचे विदारक चित्र सभागृहासमोर मांडले. दुष्काळ कायमचा संपवा, त्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करा, अशा आग्रही मागण्या नव्याने आलेल्या सदस्यांनी केल्या. त्यांचे हे रूप पाहून सभागृहातील ज्येष्ठांनीही त्यांच्या सुरात सूर मिसळला. एरवी सायंकाळनंतर रिकाम्या बाकांसमोरील चर्चा पाहण्याची सवय लागलेल्या सभागृहाच्या भिंतीदेखील भरलेले सभागृह पाहून अचंबित झाल्या असतील!
अर्धे सदस्य पहिल्यांदा निवडून आलेले. त्यांच्या मनाचा अचूक वेध दुसऱ्यांदा निवडून आलेल्या अनेक सदस्यांनी आपल्या भाषणातून घेतला. नवीन आलेले सदस्य अपेक्षेने येथे आले आहेत. येताना शेतकऱ्यांच्या भावना विधानसभेत मांडू आणि तुम्हाला न्याय मिळवून देऊ असे आश्वस्त करून आले आहेत. आम्हीदेखील पहिल्यांदा सभागृहात आलो तेव्हा हेच केले होते. मात्र दुसऱ्यांदा निवडून आलो तेव्हा आमच्या पदरी निराशा आहे. आम्ही दोन्ही बाजूचे सभागृह पाहिले आहे. सत्ताधारी आज विरोधक आहेत आणि विरोधक आज सत्ताधारी आहेत. दोघांच्या बसण्याच्या जागा बदलल्या आहेत पण त्या जागांवरून जे बोलले जात होते त्यात काहीच बदल झालेला नाही... एवढी वर्षे आम्ही बोलत आहोत, येथे येतो, चर्चा करतो, मागण्या मांडतो, पण पदरात काहीच पडत नाही... शेतकऱ्यांसाठी दुष्काळावर कायमस्वरूपी तोडगा कधी निघेल की नाही... अशा शब्दात बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अर्जुन खोतकर यासारख्या अनेकांनी नेमके जखमेवर बोट ठेवले तेव्हा दोन्ही बाजूच्या सदस्यांनी बाके वाजवून याचे स्वागतच केले. बागलणच्या आ. दीपिका चव्हाण या नव्याने आलेल्या महिला सदस्यांनी आपले लिखीत भाषण वाचले पण त्यामागचा भाव हाच होता.