नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ, महापूर
By Admin | Updated: December 20, 2014 02:45 IST2014-12-20T02:45:02+5:302014-12-20T02:45:02+5:30
नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ व महापुराचे संकट ओढवू शकते. या प्रकल्पामुळे प्रचंड खर्च तर होईलच, परंतु कुठलेही फलदायी चित्र दिसणार नाही.

नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ, महापूर
चंद्रकांत जाधव, जळगाव
नदीजोड प्रकल्पामुळे दुष्काळ व महापुराचे संकट ओढवू शकते. या प्रकल्पामुळे प्रचंड खर्च तर होईलच, परंतु कुठलेही फलदायी चित्र दिसणार नाही. त्यामुळे त्यास विरोध असल्याचे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी ‘लोकमत’ला शी बोलताना व्यक्त केले.
जैन हिल्स येथे आयोजित राष्ट्रीय जल-जन-अन्न सुरक्षा परिषदेसाठी राजेंद्र सिंह येथे आले आहेत. नदीजोड प्रकल्प जलसंकटावर उपाय नाही. त्यामुळे पाण्याची समस्या सुटेल, असे वाटत नाही. पण महापूर व दुष्काळ अशा दुहेरी आव्हानांना सामोरे जावे लागेल. राज्यांतील जलविवाद आणखी वाढतील. सर्वांना पाणी तर मिळणार नाहीच, मात्र प्रकल्पावर मोठा खर्च होईल. लोकांना नद्यांशी जोडणे, जलजागृती हेच जलसंकटावरील प्रमुख उपाय आहेत.
दुष्काळी स्थितीशी सामना करताना कमी पाण्यावर येणारी पिके घ्यावीत. हरभरा, ज्वारी आदी पिकांची पेरणी वाढवा. पाण्याचा प्रत्येक थेंब पेरा, पाणी जिरवा. मृत नद्याचें पुनरुज्जीवन करा. नद्यांचे स्त्रोत जिवंत करा. लोकांमध्ये पाण्याची काटकसर, पाण्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करा. जीवसृष्टीचे एकमेकांशी असलेले संबंध ओळखा. त्यांच्याबाबत संवेदनशील व्हा, हाच शाश्वत मार्ग आहे.