मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार
By Admin | Updated: February 20, 2015 01:09 IST2015-02-20T01:06:07+5:302015-02-20T01:09:32+5:30
पानसरे व त्यांच्या पत्नीवरील हल्लाप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी गारगोटीतील संशयित तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मारेकऱ्यांचे रेखाचित्र तयार
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवरील हल्लाप्रकरणी महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. या प्रकरणी बुधवारी मध्यरात्री पोलिसांनी गारगोटीतील संशयित तरुणास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्षदर्शी १२वर्षीय मुलाने दिलेल्या माहितीवरून हल्लेखोरांचे रेखाचित्र पोलिसांनी तयार केले आहे.
पानसरे दाम्पत्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांच्या शोधासाठी मुंबई क्राइम ब्रँच, दहशतवादविरोधी पथक अशी सुमारे २० विशेष पथके रात्रंदिवस काम करीत आहेत.
पानसरे दाम्पत्य नाष्टा करण्यासाठी जाताना दोघा तरुणांनी उमा पानसरे यांना ‘पानसरे कुठे राहतात?’ अशी विचारणा केली. या वेळी एक-दोन मिनिटे त्यांच्याशी चर्चाही केली.
त्यानंतर नाष्टा करून परत येत असताना पत्ता विचारणाऱ्या तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशी माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे. या तरुणांनी मराठीतच पत्ता विचारल्याचे सूत्रांकडून समजते. तपासामधील काही महत्त्वाच्या धाग्यादोऱ्यांवरून पोलिसांनी गारगोटीच्या तरुणाला बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेऊन चौकशी सुरू ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
मारेकऱ्यांना प्रत्यक्ष पाहणाऱ्या शाळकरी मुलाच्या जबाबावरून पोलिसांनी त्यांची चार-पाच रेखाचित्रे बनविली आहेत. ती पानसरे दाम्पत्यास दाखविण्यासाठी गुरुवारी दुपारी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा रुग्णालयात गेले होते. या वेळी त्यांनी जखमी उमा पानसरे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या बोलण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. त्यांचा जबाब आणि मारेकऱ्यांचे रेखाचित्र त्यांना दाखविणे आवश्यक आहे. त्या दोघांनी या रेखाचित्रांना संमती दिल्यानंतरच ती पोलिसांकडून प्रसिद्धीस दिली जाणार आहेत.
च्पानसरे दाम्पत्यावरील हल्ल्याचा तपास करीत असताना शहरात महत्त्वाच्या ठिकाणी तीन मोटारसायकली बेवारस स्थितीत मिळाल्या आहेत.
च्हल्लेखोरांनी काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल वापरल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.
च्पोलिसांना सापडलेल्या मोटारसायकलींमध्ये एक पल्सरही आहे, परंतु तीच मोटारसायकल हल्लेखोरांची आहे का, हे अद्याप सिद्ध झालेले नाही. गाडीवरील चेसीस नंबर तपासून त्या गाडीच्या मालकापर्यंत पोहोचण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत.
मोबाइल कॉल्सची छाननी
पानसरे खुनी हल्ल्याचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी अत्याधुनिक तांत्रिक पद्धत अवलंबली आहे. पानसरे यांच्या निवासस्थान परिसरातील सर्व कंपन्यांच्या मोबाइल टॉवरचे लोकेशन तपासले जात आहे. हल्ल्यापूर्वी व नंतर कोणाकोणाचे कॉल्स आले-गेले याची माहिती पोलीस घेत आहेत. मोबाइल टॉवरचे लोकेशन पाहण्यासाठी मुंबईहून आलेल्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांचे पथक मुख्यालयातील सायबर सेलमध्ये बसून आहे.