देहूगावात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
By Admin | Updated: July 4, 2016 02:04 IST2016-07-04T02:04:40+5:302016-07-04T02:04:40+5:30
दोन दिवस पडत असलेल्या सतत पावसामुळे गावात ठिकठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांमधून पाणी थेट रस्त्यावर येत होते.

देहूगावात ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर
देहूगाव : दोन दिवस पडत असलेल्या सतत पावसामुळे गावात ठिकठिकाणी ड्रेनेज वाहिन्यांमधून पाणी थेट रस्त्यावर येत होते. रस्त्यावरील सखल भागात पाण्याची तळी साचली असून, प्रवेशद्वार कमानीखाली मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले होते.
देहू-देहूरोड रस्त्याच्या कडेला नुकतेच मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पालखी प्रस्थानाच्या तोंडावर रस्त्याचे काम करताना खड्डे व चर पडले होते. चर बुजविण्यात आले. मात्र, पुरेसा भराव न टाकल्याने या चरामध्ये एक मालट्रक रुतून बसला होता. त्यामुळे देहू-देहूरोड मार्गावर वाहतुकीस मोठा अडथळा होत होता. मोठ्या प्रतीक्षेनंतर मध्यम स्वरूपाचा, परंतु संततधार पाऊस पडत असल्याने शेतकऱ्याचा जीव भांड्यात पडला असून, पावसाने उघडीप दिल्यास दोन-तीन दिवसांत सोयाबीनच्या पेरणीला सुरुवात होऊ शकते. देहूगाव परिसरात अद्यापपर्यंत मोठा पाऊस पडला नव्हता. त्यामुळे शेतीची नांगरणी करून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. ज्या शेतकऱ्यांना पाण्याची सोय होती, त्यांनी भाजीपाला पिकविला होता. दोन दिवसांपासून या परिसरात पाऊस सुरू झाल्याने शेतामध्ये सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले आहे. गावठाणामध्ये गटारे पावसाच्या पाण्याने तुंबल्याने पाणी रस्त्यावर आले होते. गावात नुकतीच रस्त्याची कामे झाली आहेत. गाथा मंदिर रस्ता, वडाचा माळ परिसरात डे्रनेज जोडली नसल्याने ती ठिकठिकाणी तुंबली होती. त्याच्या चेंबरमधून पाणी थेट रस्त्यावर येत होते. (वार्ताहर)