डॉ. सिद्धार्थ धेंडे पुण्याचे नवे उपमहापौर
By Admin | Updated: June 14, 2017 15:26 IST2017-06-14T15:26:40+5:302017-06-14T15:26:40+5:30
शहराच्या उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची अविरोध निवड झाली. काँग्रेसच्या लता राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र

डॉ. सिद्धार्थ धेंडे पुण्याचे नवे उपमहापौर
पुणे, दि. 14 - पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची अविरोध निवड झाली. काँग्रेसच्या लता राजगुरू यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र दिवंगत उपमहापौर नवनाथ कांबळे यांना श्रद्धांजली म्हणून अर्ज मागे घेत असल्याचे काँग्रेसने जाहीर केले. त्यामुळे डॉ. धेंडे निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले.
पिठासीन अधिकारी म्हणून महिला व बाल कल्याण आयुक्त लहुराज माळी यांनी काम पाहिले. त्यांना नगरसचिव सुुनिल पारखी यांनी साह्य केले. महापौर मुक्ता टिळक, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे तसेच अन्य पक्षांचे गटनेते, नगरसेवक यावेळी उपस्थित होते.
महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात निवडणुक प्रक्रिया झाली. अर्ज माघारीच्या वेळेत काँग्रेसच्या लता राजगुरू यांनी अर्ज मागे घेतला. उपमहापौर कांबळे यांच्या अचानक निधनामुळे ही निवडणूक घेण्यात आली. ती पार्श्वभूमी निवडणुकीला असल्यामुळे वातावरण गंभीर होते. डॉ. धेंडे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनीही फार जल्लोष न करता शांततेत हा विजय साजरा केला.
कांबळे यांचे विचार तसेच त्यांनी या पदावरून काम करताना व्यक्त केलेली परगावातील विद्यार्थ्यांसाठी महापालिकेचे वसतीगृह सुरू करण्याची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे डॉ. धेंडे यांनी सांगितले. सभागृहात नंतर डॉ. धेंडे यांचा गौरव करणारी भाषणे झाली. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे तसेच अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.