डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले नाहीत ही खंत

By Admin | Updated: September 27, 2015 05:46 IST2015-09-27T05:46:49+5:302015-09-27T05:46:49+5:30

देशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुुख म्हणून दीर्घकाळ काम करताना पोलिसांचे प्रलंंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान मला आहे.

Dr. Narendra Dabholkar's killers are not found | डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले नाहीत ही खंत

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी सापडले नाहीत ही खंत

जमीर काझी, मुंबई
देशातील एक सर्वोत्कृष्ट पोलीस दल असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाचा प्रमुुख म्हणून दीर्घकाळ काम करताना पोलिसांचे प्रलंंबित प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान मला आहे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा शोध लावू शकलो नाही यांची खंत वाटते, असे राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
राज्य पोलीस दलाचे गेल्या ३८ महिन्यांपासून नेतृत्व करीत असलेले दयाल येत्या बुधवारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्त त्यांची भेट घेतली असता आपल्या कारर्किदीचा आढावा घेताना ‘सनातन संस्थेवरील बंदीचा प्रस्ताव शासनाकडून का प्रलंबित राहिला हे मी सांगू शकत नाही. परंतु कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागे ही संस्था असल्याचे सबळ पुरावे मिळाल्यानंतरच त्यांच्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव पुन्हा आणला जाऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्याशी केलेली बातचित -
कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित समीर गायकवाडबाबत पोलिसांवर आरोप होत आहेत, नेमकी काय परिस्थिती आहे?
या प्रकरणाचा तपास सुरु असल्याने मी अधिक बोलू शकणार नाही, मात्र पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु असून महत्वपूर्ण धागेदोरे हाताशी लागले आहेत. लवकर हत्येचा पूर्ण कट उघडकीस येईल, याची मला खात्री आहे.
पोलीस महासंचालक म्हणून इतका कार्यकाळ लाभलेले तुम्ही के. सी. मेर्ढेकर यांच्यानंतरचे दुसरे अधिकारी आहात, त्याबाबत काय वाटते?
महासंचालक म्हणून इतकी वर्षे काम पाहाता आले हे भाग्यच होते. यात माझ्याबरोबरच दोन लाख १५ हजार पोलिसांचाही वाटा आहे. त्यांच्या सहकार्यामुळेच काम करता आले. काही योजना राबविता आल्या याचे समाधान वाटते.
पोलीस महासंचालक म्हणून घेतलेले महत्वपूर्ण निर्णय कोणते?
बंदोबस्तानिमित्त पोलिसांच्या हक्काच्या साप्ताहिक सुटीवर गदा येते आणि त्याबदल्यात कॉन्स्टेबलना अवघे ३५ तर फौजदारांना ९० रुपये दिले जात होते. त्यात वाढ करण्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. आता सुटीच्या दिवशी काम केल्यास त्यांना एक दिवसाचा पगार मिळतो. त्याचप्रमाणे शिपाई ते सहाय्यक फौजदारांना पूर्वी दरवर्षी गणवेष दिला जात असे. मात्र ते कधीच वेळेवर मिळत नव्हते. शिवाय कापड देखील चांगल्या प्रतीचे नसायचे. त्यामुळे आता दरवर्षी ५ हजार १७३ रुपये थेट त्यांच्या बॅँक खात्यात जमा होतात.
पोलिसांच्या आठ तास ड्युटीचे नियोजन का होत नाही ?
पोलिस भरती होत असली तरी त्यांच्यावर विविध कामांची जबाबदारीही वाढविली जाते. त्यामुळे पोलिसांना आठ नव्हे तर, १२ - १३ तास काम करावे लागते. त्याशिवाय घरातून येण्याजाण्याच्या प्रवासासाठी २ तास लागतात. त्यामुळे आठ तासांच्या ड्युटीसाठी अतिरिक्त कामे, व्हीआयपींसाठीचे अतिरिक्त मनुष्यबळ कमी करणे यासारख्या पर्यायांचा विचार करावा लागणार आहे.

Web Title: Dr. Narendra Dabholkar's killers are not found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.